IND W vs WI W 3rd ODI : टीम इंडियाकडून वेस्ट इंडिजचा सूपडा साफ, तिसऱ्या वनडेसह मालिकेवरही 3-0 ने केला कब्जा…

IND W vs WI W 3rd ODI : भारतीय महिला संघाने शुक्रवारी वडोदरा येथे खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पाच गडी राखून पराभव केला आहे. यासह भारताने टी-20 मालिकेनंतर एकदिवसीय मालिकाही 3-0 ने खिशात घातली आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने 38.5 षटकात 10 गडी गमावून 162 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 28.2 षटकांत 5 विकेट गमावत 167 धावा केल्या आणि सामना जिंकला. मालिकेतील पहिला सामना भारताने 211 धावांनी जिंकला होता तर दुसऱ्या सामन्यात 115 धावांनी विजय नोंदवला होता. त्यानंतर टीम इंडियाने तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला.
चिनले हेन्रीची अर्धशतकी खेळी…
वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात खूपच खराब झाली. क्वेना जोसेफ आणि हेली मॅथ्यूज खाते न उघडताच बाद झाल्या. रेणुका सिंग ठाकूरने दोन्ही सलामीवीरांना आपला बळी बनवले. मात्र, यानंतर शीमन कॅम्पबेलेने 62 चेंडूत 46 धावांची तर चिनले हेन्रीने 72 चेंडूत 61 धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला. दोघींनी 97 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी नसती तर संघाला शंभर धावाही करता आल्या नसत्या. याशिवाय आलिया एलेनी हिने 21 धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त एकाही फलंदाजांला दुहेरी धावांचा आकडाही गाठता आला नाही.
दीप्ती शर्मा आणि रेणुका ठाकूरची घातक गोलंदाजी…
भारताकडून दीप्ती शर्मा ही सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. दीप्ती शर्माने 10 षटकांत 31 धावा देत 6 बळी घेतले. तर रेणुका सिंह ठाकूरने 9.5 षटकांत 29 धावांत 4 फलंदाज बाद केले.
A COMPREHENSIVE 3-0 series win for India 🔥#INDvWI SCORECARD: https://t.co/Y2pPVPCh4G pic.twitter.com/CftbuOUoTd
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 27, 2024
भारताचा डाव….
लक्ष्याचा पाठलाग करताना अव्वल फळी कोसळूनही भारतीय संघ 29व्या षटकात विजयाची नोंद करण्यात यशस्वी ठरला. भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर स्मृती मंधाना 19 चेंडूत 4 धावा करून तर प्रतिका रावल 23 चेंडूत 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. गेल्या सामन्यातील शतकवीर हरलीन देओलही फक्त 1 धावा करून माघारी परतली.
भारतानं 55 धावांच्या स्कोअरवर भारताने तीन विकेट गमावल्या होत्या पण त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने 22 चेंडूत 32 धावांची आणि मधल्या फळीतील फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्जने 45 चेंडूत 29 धावांची खेळी करत विजयाचा पाया रचला. त्यानंतर अष्टपैलू दीप्ती शर्माच्या 48 चेंडूत नाबाद 39 आणि यष्टिरक्षक फलंदाज रिचा घोषच्या 11 चेंडूत नाबाद 23 धावांच्या जोरावर संघाने 21 षटकांपूर्वीच विजयावर शिक्कामोर्तब केले. वेस्ट इंडिजसाठी डिआंड्रा डॉटिन, एलिजा एलियान, हेली मॅथ्यूज, एफी फ्लेचर आणि करिश्मा रामचरक यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.
रेणूका ठरली मालिकेची मानकरी….
भारताची अष्टपैलू खेळाडू दिप्ती शर्मा सामन्याची मानकरी ठरली. तिने प्रथम गोलंदाजीत (31 धावा देत 6 बळी) आणि नंतर फलंदाजीत (48 चेडूंत नाबाद 39 धावा) उत्कृष्ट कामगिरी करत विजयात महत्वपूर्ण योगदान दिले. तर वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूर मालिकेची मानकरी ठरली. तिने मालिकेतील 3 सामन्यात एकूण 10 विकेट घेतल्या.





