Pune District : इंद्रायणी नदीपात्र पुन्हा फेसाळलं
मोशी आणि चिंबळी परिसरातील शेतीला पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने येथे कोल्हापूर पद्धतीचा (के. टी.) बंधारा बांधला आहे.

चिंबळी: श्री क्षेत्र आळंदी ते देहू या पवित्र तीर्थक्षेत्रांतून वाहणार्या इंद्रायणी नदीच्या पात्रात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर पांढरा फेस निर्माण झाला आहे. नदीत ऑईलमिश्रित रसायने आणि सांडपाणी सोडले जात असल्याने मोशी-चिंबळी हद्दीतील नदीपात्र फेसाळल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या चार दिवसांपासून नदीवर फेसाचे थर दिसत असून, बटवाल वस्ती आणि परिसरातील नागरिकांना तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे, दूषित पाण्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची भीती शेतकर्यांना सतावत आहे.
मोशी आणि चिंबळी परिसरातील शेतीला पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने येथे कोल्हापूर पद्धतीचा (के. टी.) बंधारा बांधला आहे. मात्र, याच बंधार्याच्या परिसरात गेल्या पाच ते सहा महिन्यांत तीन ते चार वेळा पांढरा फेस निर्माण झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. औद्योगिक वसाहतींमधून प्रक्रिया न केलेले ऑइलमिश्रित सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने ही परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सध्या रब्बी हंगामाची लगबग सुरू असून शेतकरी पिकांना पाणी देण्याच्या तयारीत आहेत. मात्र, इंद्रायणीचे पाणी दूषित आणि फेसाळलेले असल्याने ते पिकांसाठी वापरल्यास पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करणार्या शेतकर्यांसमोर नदी प्रदूषणाचे नवे संकट उभे राहिले आहे.
नदीपात्रातील फेसाचे थर वार्यामुळे हवेत उडत असून, बटवाल वस्ती परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास आणि अन्य आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची भीती आहे. पवित्र मानल्या जाणार्या इंद्रायणी नदीची ही दुरवस्था पाहून भाविक आणि पर्यावरणप्रेमींमधूनही नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन नदीपात्रात ऑईलमिश्रित रसायने आणि सांडपाणी सोडणार्या कंपन्यांची तपासणी करावी. दोषी आढळणार्या कंपन्या आणि जबाबदार घटकांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी मोशी-चिंबळी परिसरातील शेतकरी आणि नागरिकांकडून होत आहे.





