Indrayani River : लोखंडी सांगाडे, सिमेंटचे खांब आणि डागडुजी…; पुलाचा खरा इतिहास समोर !

Indrayani River – कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून रविवारी (दि. १५) भीषण दुर्घटना घडली. दरम्यान इंद्रायणी नदीवरील हा पूल कसा कोसळला, पुलाची स्थिती इतकी नाजूक होती का? पूल वाहतुकीस बंद नव्हता का? अशा अनेक प्रश्नांची चर्चा होत असताना या पुलाचा इतिहास समोर आला आहे.
इंद्रायणी नदीच्या पात्रात असलेले कुंडजाई मातेचे मंदिर आणि त्याच बाजूला असलेले कुंडमळा, तर कुंडमळ्याच्या विरुद्ध दिशेला असलेले शेलारवाडी गाव. या दोन्ही ठिकाणांना जोडण्यासाठी आणि येथील स्थानिकांच्या रोजच्या रहदारीसाठी इंद्रायणी नदीवर साधारण ३० वर्षापूर्वी हा पूल बांधण्यात आला होता, अशी माहिती माजी आमदार बाळा भेगडे यांनी दिली.
दरम्यान अनेक वर्षे वापरानंतर हा पूल जीर्ण झाला होता. त्यामुळे वाहतुकीस अयोग्य झाल्याने त्यावरील वाहतूक बंद केली होती. तसेच याठिकाणी नव्या पुलाची बांधणी करण्याची स्थानिकांची मागणी होती. स्थानिकांच्या मागणीनुसार नव्या पुलाला गतवर्षी मंजुरी मिळाली होेती. परंतु ते काम पुढे सरकले नाही. यात पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी पूल बंद करण्यात आला होता. तसेच दोन्ही बाजूस सूचना फलक लावण्यात आले होते.
जूना लोखंडी पूल :
1. साधारण १९९७ साली हा पूल बांधण्यात आला
2. पुलाच्या दोन्ही बाजूस सिमेंटचे खांब व स्लॅब
3. दोन्ही बाजूच्या खांबांना लोखंडी सांगड्याने जोडले
4. अनेक वर्षे वापरानंतर लोखंडी सांगाडा जीर्ण झाला
5. तात्पुरत्या डागडुजीनंतर रहदारीसाठी खुला केला होता
6. पावसाळ्यात वाहतुकीसाठी पूल पूर्णतः बंद





