French Open 2024 : बोपन्ना-एबडेन जोडीला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का…

पॅरिस : भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेन यांना गुरूवारी पॅरिसमध्ये 2024 फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. इटलीच्या सिमोन बोलेली आणि अँड्रिया वावसोरी यांच्याकडून पराभूत झाल्याने बोपण्णा-एबडेन यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
उपांत्य फेरीच्या सामन्यात 44 वर्षीय बोपण्णा आणि 36 वर्षीय एबडेन (Rohan Bopanna & Matthew Ebden) या दुसऱ्या मानांकित जोडीला बोलेल्ली आणि वावसोरी (Simone Bolelli & Andrea Vavassori) या 11व्या मानांकित इटालियन जोडीकडून 5-7, 6-2, 2-6 ने पराभव पत्करावा लागला.
French Open 2024 : गतविजेत्या ‘नोव्हाक जोकोविच’ची फ्रेंच ओपनमधून माघार..! समोर आलं ‘हे’ कारण…
दरम्यान, बोपण्णा आणि एबडेन या ऑस्ट्रेलियन ओपन विजेत्या जोडीने पहिल्या फेरीत ब्राझीलच्या मार्सेलो झोरमन आणि ओरलँडो लुझ यांचा 7-5, 4-6, 6-4 असा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी पुढच्या फेरीत भारताचा एन श्रीराम बालाजी आणि मेक्सिकोचा मिगुएल एंजल रेयेस वरेला या जोडीचा 6-7 (2-7), 6-3, 7-6 (10-8) असा पराभव केला होता तर उपांत्यपूर्व फेरीत सँडर गिले आणि जोरान व्लिगेन या बेल्जियमच्या जोडीचा 7-6 (7-3), 5-7, 6-1 असा पराभव करून उपात्यंफेरीत धडक मारली होती.





