Paris Olympics 2024 (Badminton) : लक्ष्य सेनला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का, आता कांस्यपदकासाठी करणार स्पर्धा…

Paris Olympics 2024 (Badminton,Lakshya Sen vs Viktor Axelsen) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने आतापर्यंत तीन कांस्य पदके जिंकली आहेत. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारताचा 9वा दिवस आहे आणि पुरुषांच्या बॅडमिंटन एकेरीत , भारताचा शटलर लक्ष्य सेन आणि गत ऑलिम्पिक चॅम्पियन डेन्मार्कचा व्हिक्टर एक्सेलसेन यांच्यात उपांत्य फेरीचा सामना झाला. या उपांत्य फेरीच्या सामन्यात लक्ष्यला 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला असला तरी, त्याचा प्रवास अजूनही संपलेला नाही.
आता तो कांस्यपदकाच्या लढतीत मलेशियाचा शटलर ली जी जियाविरुद्ध खेळताना दिसणार आहे. म्हणजेच त्याला पदक जिंकण्याची अजून संधी आहे. कांस्यपदकासाठीची लढत ही सोमवारी(5 आॅगस्ट 2024) सांयकाळी 6 वाजता रंगणार आहे. त्यामुळे लक्ष्यकडून भारताला पदकाच्या आशा कायम आहेत.
🏸 Lakshya Sen will play for the Bronze Medal Match.#Paris2024 #Cheer4Bharat #Olympics #Badminton https://t.co/mlQ2B3bs21
— Doordarshan Sports (@ddsportschannel) August 4, 2024
लक्ष्यने सामना गमावला असला तरी त्याने वर्ल्ड नंबर-2 व्हिक्टरला तगडी टक्कर दिली. व्हिक्टरसाठी हा विजय अजिबाताचं सोपा नव्हता. लक्ष्यने त्याला सामन्यात वेळोवेळी टक्कर दिली. लक्ष्य सेनने पहिला गेम 20-22 च्या फरकाने तर दुसरा गेम 14-21 च्या फरकाने गमावला.
पहिल्या गेममध्ये लक्ष्य सेन आणि व्हिक्टर एक्सेलसन यांच्यात जबरदस्त लढत पाहायला मिळाली. लक्ष्य सेनने शेवटपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली होती. पण पहिला गेम 20-20 असा बरोबरीत आला असता यानंतर व्हिक्टरने सलग दोन गुण मिळवले आणि अखेरीस लक्ष्यला 20-22 ने पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या गेममध्येही दोघात चुरशीची स्पर्धा झाली. एकेवेळी लक्ष्यने 7-0 अशी आघाडी घेतली होती पण त्याला ती कायम राखता आली नाही आणि अखेरीस त्याला 14-21 ने दुसऱ्या गेमसह सामनाही गमवावा लागला.





