French Open 2024 : गतविजेत्या ‘नोव्हाक जोकोविच’ची फ्रेंच ओपनमधून माघार..! समोर आलं ‘हे’ कारण…

French Open 2024 (Novak Djokovic ) : अनुभवी टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने बुधवारी फ्रेंच ओपन 2024 मधून अचानक आपले नाव मागे घेतले. गुडघ्याच्या दुखापतीमुळे सर्बियन खेळाडूने हा निर्णय घेतला आहे. कॅस्पर रुडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यापूर्वी त्याला माघार घ्यावी लागली आहे. रुडला आता वॉकओव्हर मिळाला आहे आणि उपांत्य फेरीत त्याचा सामना अलेक्झांडर झ्वेरेव्ह किंवा 11व्या मानांकित ॲलेक्स डी मिनौरशी होईल.
फ्रान्सिस्को सेरुंडोलोचा पराभव करून जोकोविचने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. उजव्या गुडघ्याच्या दुखण्याने त्रस्त असतानाही त्याने सेरुंडोलोविरुद्ध संघर्षमय खेळ केला. हा सामना पाच सेटपर्यंत चालला. साडेचार तास चाललेल्या या सामन्यात जोकोविचने आपल्या युवा प्रतिस्पर्ध्याचा 6-1, 5-7, 3-6, 7-5, 6-3 असा पराभव केला.
दुस-या सेटच्या सुरुवातीला जोकोविचला दुखापत जाणवू लागली होती आणि त्याला सामना सोडावा लागेल असे वाटत होते. तथापि, जोकोविचने हिंमत गमावली नाही आणि आपला विक्रमी 370 वा ग्रँड स्लॅम सामना जिंकून पुनरागमन केले. तो ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा खेळाडू ठरला आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 369 ग्रँडस्लॅम सामने जिंकणाऱ्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला मागे टाकले.
फ्रेंच ओपनमधून जोकोविचने माघार घेतल्याने त्याच्या 25व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या आशा संपुष्टात आल्या. त्याचबरोबर पुढील महिन्यात 1 जुलैपासून होणाऱ्या विम्बल्डनमध्ये खेळण्याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. तसेच फ्रेंच ओपनमधून माघार घेतल्यानंतर जोकोविचला एटीपी क्रमवारीत नुकसानीचा सामना करावा लागला आहे. त्याची क्रमवारीतील बादशाहत संपुष्टात आली आहे. आता जॅनिक सिनरला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळाले आहे.
Indonesia Open 2024 : भारताची स्टार शटलर पी.व्ही. सिंधूची ‘हाराकिरी’ कायम…
आयोजकांनी एका निवेदनात म्हटले आहे की, जोकोविचच्या उजव्या गुडघ्याच्या ‘मेडियल मेनिस्कस’ला दुखापत झाली आहे. एमआरआय तपासणीदरम्यान या दुखापतीचे गांभीर्य उघड झाले. दुखापतीमुळे जोकोविचला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.






