Forex : भारतीय परकीय चलन साठ्यात होत असलेली घट कायम…

India’s foreign exchange reserves – परदेशी गुंतवणूकदारांकडून शेअर बाजारात विक्री होत आहे. त्याचबरोबर थेट परकीय गुंतवणुकीचे प्रकल्प फारसे मार्गी लागत नाहीत. या कारणामुळे परकीय चलन साठ्यात होत असलेली घट कायम राहिली. आठ नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा 6.4 अब्ज डॉलरने कमी होऊन 675.6 अब्ज डॉलर झाला.
या अगोदरच्या आठवड्यातही भारताकडील परकीय चलन साठा 2.6 अब्ज डॉलर नाही कमी झाला होता. सप्टेंबरच्या अखेरीस भारताची परकीय चलन साठ्याची परिस्थिती कमालीची बळकट होती. अमेरिकेत अर्धा टक्के व्याजदर कपात झाल्यानंतर परदेशी गुंतवणूकदारांनी भारतात मोठ्या प्रमाणात शेअर खरेदी केली. त्यामुळे भारताकडील परकीय चलन साठा 704 अब्ज डॉलर या विक्रमी पातळीवर गेला होता.
मात्र त्यानंतर भारताकडील परकीय चलन साठ्यात घट होत आहे. याचा दबाव रुपयाच्या मूल्यावर येत आहे. गेल्या पंधरा दिवसात रुपयाचे मूल्य मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. जागतिक बाजारात सोन्याचे दर वेगाने कमी होत आहेत. अशा परिस्थितीत रिझर्व बँकेकडे असलेल्या सोन्याचे मूल्य या कालावधीत दोन अब्ज डॉलरने कमी होऊन 68 अब्ज डॉलर वर आले आहे.
भारताकडील परकीय चलन साठ्यात रिझर्व बँकेकडे असलेल्या सोन्याचा साठयाचा समावेश करण्यात येत असतो. परकीय चलन साठा परिस्थिती सुधारावी यासाठी भारत निर्यात वाढविण्याचा आणि काही देशाबरोबर डॉलरशिवाय इतर माध्यमातून व्यापार करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या असलेला भारताकडील परकीय चलन साठा जवळजवळ एक वर्ष आयातीसाठी पुरेल एवढा आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.


