मुंबई – रिझर्व बँकेने जारी केलेल्या माहितीनुसार भारताकडे असलेल्या परकीय चलन साठ्यात 4.3 अब्ज डॉलरची वाढ होऊन हा साठा 693 अब्ज डॉलर या पातळीवर गेला आहे. गेल्या आठवड्यातही हा परकीय चलन साठा 1.6 अब्ज डॉलरने वाढला होता. आकडेवारीनुसार या आठवड्यामध्ये सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. अशा परिस्थितीत रिझर्व बँकेकडे असलेल्या सोन्याचे मूल्य या आठवड्यात 2.6 अब्ज डॉलरने वाढून 110.3 अब्ज डॉलर या पातळीवर गेले आहे. परिणामी भारताच्या एकूणच परकीय चलन साठ्याच्या मूल्यात वाढ होण्यास मदत झाली आहे. सोन्याच्या साठ्याच्या मूल्यात वाढ झाल्यामुळेच परकीय चलन साठा वाढला आहे. कारण शेअर बाजार आणि रोखे बाजारातून या आठवड्यात गुंतवणूक परत गेली होती. परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी रिझर्व बँक आणि वाणिज्य मंत्रालय प्रयत्न करीत आहे.