Foreign Exchange Reserves: युद्ध बंद होताच भारताचा परकीय चलन साठा वाढायला सुरूवात; 697.1 अब्ज डॉलरवर पोहोचला
Foreign Exchange Reserves: 27 फेब्रुवारी रोजी म्हणजे युद्ध सुरू होण्याअगोदर भारताकडे 728.4 अब्ज डॉलर इतका विक्रमी परकीय चलन साठा होता.

Foreign Exchange Reserves: आखातातील पेचप्रसंग संपुष्टात येण्याची शक्यता वाढली आहे. त्याचबरोबर सोन्याचे दर या आठवड्यात बर्याच प्रमाणात वाढले. त्यामुळे भारताकडील परकीय चलन साठ्यात भक्कम वाढ झाली असल्याचे दिसून येते. या अगोदरच्या दोन आठवड्यामध्ये भारताकडील परकीय चलन साठा बराच कमी झाला होता. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
युद्ध संपुष्टात येण्याची शक्यता वाढल्यामुळे भारतातील विविध क्षेत्रात आशावाद निर्माण झाला आहे. चलन बाजारावरही याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या माहितीनुसार तीन एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा नऊ अब्ज डॉलरने वाढून 697.1 अब्ज डॉलर या पातळीपर्यंत गेला आहे.
परकीय चलनसाठा या अगोदरच्या आठवड्यात तब्बल 10.2 अब्ज डॉलरने कमी झाला होता. विशेष म्हणजे ही आकडेवारी युद्ध संपण्याची घोषणा होण्यापूर्वीची आहे. आता युद्ध समाप्त झाल्यानंतर या आघाडीवर भारताची परिस्थिती अधिक सकारात्मक होईल असे समजले जाते.
27 फेब्रुवारी रोजी म्हणजे युद्ध सुरू होण्याअगोदर भारताकडे 728.4 अब्ज डॉलर इतका विक्रमी परकीय चलन साठा होता. 28 फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्यापासून परकीय चलन साठ्यावर दबाव आला होता. आता परिस्थिती वेगाने सकारात्मक होत असल्याचे दिसून येते.
संबंधित आठवड्यामध्ये जागतिक बाजारात सोन्याच्या किमती बर्याच वाढल्या. त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडे असलेल्या सोन्याचे मूल्य या कालावधीत 7.2 अब्ज डॉलरने वाढून 120. 74 अब्ज डॉलर या पातळीवर गले आहे. त्यामुळे भारताकडील परकीय चलन साठ्याचे मूल्य या कालावधीत वाढण्यास मदत झाली आहे. दरम्यानच्या काळामध्ये रिझर्व्ह बँकेने रुपयाला आधार देण्यासाठी केलेल्या उपाययोजना यशस्वी होत आहेत.



