Indian Womens Team : विश्वविजेत्या महिला संघावर पैशांचा वर्षाव! ICC आणि BCCI च्या बक्षीसानंतर हिऱ्यांचे हार मिळणार गिफ्ट

Indian Womens Team will get diamond jewellery and solar panels : आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ चा ऐतिहासिक खिताब जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघावर बक्षिसांची बरसात सुरू झाली आहे. या आनंदोत्सवात सामील होत, सूरतचे मोठे उद्योगपती आणि राज्यसभा खासदार गोविंद ढोलकिया यांनी टीम इंडियाच्या प्रत्येक सदस्याला खास आणि दिमाखदार भेटवस्तू देण्याची घोषणा केली आहे.
चॅम्पियन खेळाडूंना मिळणार अस्सल हिऱ्यांचे दागिने –
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने रविवारी (२ नोव्हेंबर २०२५) दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करून आपले पहिले विश्वचषक विजेतेपद पटकावले. या विलक्षण कामगिरीचा सन्मान करण्यासाठी, ढोलकिया यांनी संघातील प्रत्येक खेळाडूला हाताने बनवलेले अस्सल हिऱ्याचे दागिने भेट देण्याची घोषणा केली आहे.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांना पत्र लिहून ढोलकिया यांनी आपली ही इच्छा व्यक्त केली. पत्रात त्यांनी लिहिले, “त्यांच्या या असाधारण प्रवासाचा उत्सव साजरा करण्यासाठी, आम्ही चॅम्पियन भारतीय संघाच्या प्रत्येक सदस्याला हाताने बनवलेले अस्सल हिऱ्याचे दागिने भेट देऊन सन्मानित करू इच्छितो. हे त्यांच्या शानदार कामगिरीसाठी आणि कधीही हार न मानणाऱ्या जिद्दीसाठी ‘टोकन ऑफ ॲप्रिसिएशन’ असेल.” ढोलकिया यांच्या मते, ही भेट भारतीय महिला खेळाडूंच्या कठोर परिश्रमाची आणि यशाची चमक दर्शवेल.
हेही वाचा – IHPL League Scam : धक्कादायक! श्रीनगरमध्ये IHPL आयोजक रातोरात गायब, गेलसारखे खेळाडू अडकले!
शाश्वत ऊर्जेचा अनोखा ‘सौर’ भेटवस्तू –
समाजसेवेच्या कार्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ढोलकिया यांनी दागिन्यांसोबतच एक अद्वितीय आणि शाश्वत भेट देण्याचीही घोषणा केली आहे. त्यांनी संघातील सर्व सदस्यांच्या घरांसाठी रूफटॉप सोलर पॅनेल भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
यामागचा उद्देश स्पष्ट करताना त्यांनी पत्रात नमूद केले की, “यासोबतच, आम्ही त्यांच्या घरांसाठी रूफटॉप सोलर पॅनेल देखील भेट देऊ इच्छितो, जेणेकरून ज्या प्रकाशाने त्यांनी आमच्या देशाला प्रकाशित केले आहे, तो प्रकाश त्यांच्या स्वतःच्या जीवनातही कायम तेवत राहील.” ढोलकिया यांनी या भेटीला ‘दिल से दिया गया तोहफा’ (मनापासून दिलेली भेट) असे म्हटले आहे, जो लोकांचे आणि पर्यावरणाचे भलं करण्याच्या त्यांच्या विश्वासाला दर्शवतो.
हेही वाचा – IND vs AUS : ट्रॅव्हिस हेड भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेतून बाहेर! नेमकं कारण काय? घ्या जाणून
ढोलकिया पुढे म्हणाले,”महिला क्रिकेटपटूंनी आपल्या धैर्य, शिस्त आणि दृढ संकल्पाने आधीच अब्जावधी भारतीयांची मने जिंकली आहेत.” मैदानावरील यशाला समाजात ऊर्जा आणि प्रेरणेशी जोडणारे ढोलकिया यांचे हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे.





