IHPL 2025 Scam Updates : जम्मू-कश्मीरच्या श्रीनगरमध्ये २५ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या इंडियन हेवन प्रीमियर लीग (IHPL) क्रिकेट स्पर्धा आता मध्येच बंद करावी लागली आहे, वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू ख्रिस गेलसह अनेक विदेशी खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. मात्र, २ नोव्हेंबरच्या रात्री आयोजकांनी सर्वकाही सोडून श्रीनगरमधून पळ काढला, ज्यामुळे अनेक विदेशी खेळाडू हॉटेलमध्ये अडकले. स्पर्धेचा अंतिम सामना ८ नोव्हेंबरला होणार होता, पण आता तो रद्द झाला आहे. खेळाडू आणि पंचांनी थकित पैसे न मिळाल्याने मैदानात उतरण्यास नकार दिला, तर विकेंडचे सामने रद्द करण्यात आले. खेळाडू आणि सामना अधिकाऱ्यांनी मॅनेजमेंटवर रातोरात गायब होण्याचा आरोप केला आहे. ८० लाखांहून अधिक रुपयांचे बिल थकित – अहवालानुसार, ही स्पर्धा दिल्लीच्या एका खासगी कंपनीने आयोजित केली होती आणि त्यांनी लाखो रुपयांचे पेमेंट केले नव्हते. खेळाडू ज्या हॉटेलमध्ये उतरले होते, त्या हॉटेलने सांगितले की ८० लाख रुपयांहून अधिक बिल अजून थकित आहे. हॉटेलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आयोजकांनी ९ नोव्हेंबरपर्यंत खोल्या बुक केल्या होत्या, पण त्यांनी एक पैसाही दिला नाही. आम्ही खेळाडूंना चेक आउट करण्याची परवानगी दिली, पण आमचे थकित बिल अजून बाकी आहे. स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी – आयएचपीएल स्पर्धेला आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत स्टार्ससह हाय-प्रोफाइल क्रिकेट इव्हेंट म्हणून प्रचारित करण्यात आले होते. यात एकूण आठ संघ सहभागी झाले होते. आयोजकांनी ३२ माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या सहभागाची घोषणा केली होती, पण त्यापैकी काहीच खेळाडू खेळण्यासाठी आले. वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज ख्रिस गेल आणि माजी भारतीय वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार हे मोठे चेहरे होते. श्रीलंकेचा ऑलराउंडर थिसारा परेरा, दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू रिचर्ड लेवी, ओमानचा क्रिकेटपटू अयान खान आणि पाकिस्तानी वंशाचा शोएब मुहम्मद यांनी काही सामन्यांत भाग घेतला आणि नंतर निघून गेले. गेलने जाण्यापूर्वी तीन सामने खेळले, तर परेराने फक्त एक सामना खेळला. याशिवाय, परवेज रसूल, इकबाल अब्दुल्ला, फैज फझल आणि ईश्वर पांडे असे माजी भारतीय देशांतर्गत खेळाडू सहभागी होते. हेही वाचा – Smriti Mandhana : स्मृतीला होणाऱ्या पतीने मैदानातच मिठी मारत केलं अभिनंदन! विश्वचषक विजयानंतरचा VIDEO व्हायरल पंचाने आयोजकांवर केल गंभीर आरोप – इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डशी संबंधित पंच मेलिसा जुनिपर यांनी स्पर्धेत पंचगिरी केली होती. त्यांनी सांगितले की, मॅनेजमेंट शनिवारी रात्री उशिरा पळून गेले. त्यांनी म्हटले की, आम्ही हॉटेलसोबत करार केला आहे जेणेकरून खेळाडू घरी परतू शकतील. ख्रिस गेलसह काही खेळाडू स्पर्धा मध्येच १ नोव्हेंबरला हॉटेलमधून चेक आउट करून गेले होते. स्पर्धेत खेळलेले माजी भारतीय ऑलराउंडर परवेझ रसूल यांनी सांगितले की, काही खेळाडूंना हॉटेलमधून बाहेर पडण्यापासून काही वेळ रोखले गेले, जोपर्यंत प्रकरण विदेशी दूतावासांपर्यंत पोहोचले नाही. त्यांनी हेही सांगितले की, इंग्लंडचा एक पंच ब्रिटिश दूतावासाशी संपर्क साधण्यास भाग पाडला गेला.