Indian Stock Market – शेअर बाजारातील सततच्या वाढीमुळे उत्साहित झालेल्या गुंतवणूकदारांना बुधवारी (20 डिसेंबर 2023) च्या ट्रेडिंग सत्रात मोठा धक्का बसला आहे. उत्कृष्ट जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार सकाळी सकारात्मक उघडला. मात्र दुपारनंतर देशी-विदेशी गुंतवणूकदारांनी विक्री केल्याने बाजार गडगडला. या घसरणीचा सर्वाधिक फटका मिड कॅप आणि स्मॉल स्टॉक्सना बसला आहे. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 931अंकांच्या घसरणीसह 70,506 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 303 अंकांच्या घसरणीसह 21,150 अंकांवर बंद झाला.
आजच्या व्यवहारात प्रॉफिट बुकींगमुळे मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांमध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली आहे. निफ्टीचा मिड कॅप निर्देशांक 1490 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. निर्देशांक दिवसाच्या उच्चांकावरून 2000 अंकांनी घसरला आहे. स्मॉल कॅप निर्देशांकही 543 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. तर हा निर्देशांक दिवसाच्या उच्चांकावरून सुमारे 700 अंकांनी घसरला आहे. याशिवाय एनर्जी मेटल, बँकिंग, फार्मइन्फ्रा आणि कंझ्युमर ड्युरेबल्सचे शेअर्सही घसरले. निफ्टीचा आयटी निर्देशांक 604 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी केवळ 7 समभाग वाढीसह बंद झाले तर 23 समभाग तोट्यासह बंद झाले. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 5 समभाग वाढीसह बंद झाले तर 45 समभाग तोट्यासह बंद झाले.
गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान –
शेअर बाजारातील सुनामीमुळे सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठी घसरण झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 350 लाख कोटी रुपयांवर आले जे गेल्या सत्रात 359.13 लाख कोटी रुपये होते. जवळपास गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.