Success story : जगातील सर्वात हुशार मुलांच्या यादीत भारतीय वंशाच्या प्रिशा चक्रवर्ती या नऊ वर्षीय अमेरिकेतील विद्यार्थिनीचा समावेश झाला आहे. अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स सेंटर फॉर टॅलेंटेड यूथ ही संस्था दरवर्षी जगभरातील हुशार मुलांचा शोध घेते. यात जगभरातील 90 देशांमधील 16 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची ग्रेड स्तर चाचणी घेण्यात आली होती.
या परीक्षेचं स्वरूप ‘अबव्ह ग्रेड लेव्हल टेस्ट’ म्हणजे एखादं मूल शाळेत ज्या इयत्तेत आहे त्याच्या वरच्या इयत्तांचा किती अभ्यास त्याला समजतो, याची चाचणी घेणे. यावर्षीच्या चाचणीत जॉन हॉपकिन्स सेंटर फॉर टॅलेंटेड यूथ यांनी जगातील हुशार मुलांची यादी जाहीर केली त्यात नऊ वर्षांच्या प्रिशा चक्रवर्तीचा समावेश झाला आहे.
कोण आहे प्रिशा चक्रवर्ती ?
प्रिशा ही कॅलिफोर्नियातील फ्रेमोंट येथील वार्म स्प्रिंग एलिमेंटरी स्कूलची विद्यार्थिनी आहे. CTY टॅलेंट सर्चचा एक भाग म्हणून SAT (शॉलॅस्टिक असेसमेंट टेस्ट), ACT (अमेरिकन कॉलेज टेस्टिंग), शाळा आणि कॉलेज क्षमता चाचणी किंवा तत्सम मुल्यांकनांमध्ये तिच्या कामगिरीबद्दल तिला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या परीक्षेत प्रिशा चक्रवर्ती हिला जवळपास ९९ टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर तिचे नाव या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. प्रिशाला अभ्यासासोबतच प्रवास आणि मार्शल आर्ट्स करायला आवडते. तसेच तिला नवीन गोष्टी शिकण्यात नेहमीच रस असल्याचे तिचे पालक सांगतात.
प्रिशा मेन्सा फाऊंडेशनची सदस्य
प्रिशा उच्च-आयक्यू सोसायटी मेन्सा फाऊंडेशनची लाईफटाईम सदस्य देखील आहे. यात प्रत्येकाला सदस्य होता येत नाही. हे प्रमाणित, पर्यवेक्षित IQ वर 98 व्या पर्सेंटाइलपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो. दरम्यान, या परीक्षेत उत्तम गुण मिळाल्यामुळे प्रिशाला जॉन हॉपकिन्स सेंटर फॉर टॅलेंटेड यूथ या संस्थेच्या इतर अनेक कोर्सेसमध्ये भाग घेण्याची संधी मिळणार आहे.