India beat China : भारतीय हॉकी संघाचा विजयरथ सुसाट; चीनचा ५-२ ने उडवला धुव्वा, आता जपानशी होणार महामुकाबला
India beat China : भारतासाठी हरनप्रीत सिंग आणि सुखजीत सिंग यांनी प्रत्येकी दोन गोल केले. या विजयासह भारतीय संघाने आपला सलग दुसरा सामना जिंकला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेपासून भारताची विजयी मालिका कायम आहे.

Asian Champions Trophy 2026 India beat China in Hockey : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने आपला धडाकेबाज विजयरथ कायम राखला आहे. बांगलादेशविरुद्धच्या १३-० अशा एकतर्फी विजयानंतर भारतीय संघाने लीग फेरीतील दुसऱ्या सामन्यात चीनचा ५-२ असा धुव्वा उडवला. भारताच्या या दणदणीत विजयात कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि सुखजीत सिंग यांनी प्रत्येकी दोन गोल झळकावले, तर जुगराज सिंगने एक गोल करून विजयावर शिक्कामोर्तब केला. या सलग दुसऱ्या विजयामुळे भारतीय संघाचे गुणतालिकेतील वर्चस्व अधिक भक्कम झाले आहे.
सुखजीतचा अप्रतिम गोल अन् पूर्वार्धात चुरस –
सामन्याच्या पहिल्या क्वार्टरपासूनच भारताने आक्रमक चाली रचत सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले. १२ व्या मिनिटाला बचावफळीकडून मिळालेल्या अचूक एरियल पासवर ताबा मिळवत सुखजीत सिंगने गोलरक्षकाला चकवून अप्रतिम लॉब फिनिश केला आणि भारताचे खाते उघडले. मात्र, दुसऱ्या क्वार्टरमध्ये चीनने जोरदार पुनरागमन केले; २६ व्या मिनिटाला यांग पेंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल डागून सामना १-१ असा बरोबरीत आणला.
ब्रेकनंतर भारताचे तुफान; पेनल्टी कॉर्नरवर डागले गोल –
ANOTHER WIN, ANOTHER STEP FORWARD! 🇮🇳🔥
Relive the action as the defending champions secured a 5-2 victory over China to make it two wins in a row at the Hero Asian Champions Trophy Punjab 2026! 🏑💪
#HockeyIsBack #HACT2026 #SatSriAkalAsia #IndiaKaGame https://t.co/C0qkoxvCrH
— Hockey India (@TheHockeyIndia) October 29, 2026
मध्यंतरानंतर भारतीय संघाने आक्रमणाची धार आणखी वाढवून चीनच्या बचावफळीवर प्रचंड दबाव आणला. ३१ व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर अचूक ड्रॅगफ्लिक करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत (३४ व्या मिनिटाला) सुखजीतने आपला वैयक्तिक दुसरा गोल नोंदवला. चीनकडून ३६ व्या मिनिटाला चेन चोंगकाँगने ड्रॅगफ्लिकवर गोल करत पिछाडी ३-२ अशी कमी केली; मात्र अखेरच्या क्वार्टरमध्ये ४७ व्या मिनिटाला जुगराज सिंगने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत भारताचा ५-२ असा विजय निश्चित केला.
हरमनप्रीतचा दमदार फॉर्म; शुक्रवारी जपानचे आव्हान –
TWO GAMES. TWO WINS. INDIA KEEP ROLLING! 🇮🇳🔥
The defending champions make it two wins in a row at the Hero Asian Champions Trophy Punjab 2026, following their commanding 13-0 win over Bangladesh with a 5-2 victory over China! 🇮🇳🔥🏑
Next Up: Japan on October 30, Friday
#HockeyIsBack #HACT2026 #SatSriAkalAsia #IndiaKaGame
— Hockey India (@TheHockeyIndia) October 29, 2026
कर्णधार हरमनप्रीत सिंग सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने अवघ्या दोन सामन्यांत ४ गोल डागले आहेत. भारतीय संघाच्या या चमकदार कामगिरीनंतर हॉकी इंडियाने सोशल मीडियावर खेळाडूंचे तोंडभरून कौतुक केले. लागोपाठ दोन विजयांमुळे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला असून, आता भारताचा पुढील लीग सामना शुक्रवारी, ३० ऑक्टोबर रोजी जपानविरुद्ध रंगणार आहे.





