Mumbai Indians Malinga : आयपीएल २०२७ पूर्वी मुंबई इंडियन्सचा मोठा निर्णय; लसिथ मलिंगासह तीन दिग्गज प्रशिक्षकांची हकालपट्टी
Mumbai Indians Malinga : मुंबई इंडियन्सने मलिंगासह तीन प्रशिक्षकांना कार्यमुक्त केले, जो आयपीएलमध्ये MI कडून खेळला होता.

Mumbai Indians Part Ways With Lasith Malinga Paras Mhambrey Ahead of IPL 2027 : आयपीएलच्या आगामी २०२७ (IPL 2027) हंगामापूर्वी पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्स (MI) संघाने आपल्या कोचिंग स्टाफमध्ये मोठे फेरबदल करण्याचे सत्र कायम ठेवले आहे. फ्रँचायझीने गुरुवारी अधिकृत घोषणा करत वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा, अतिरिक्त गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक कार्ल हॉपकिन्सन या तिघांशी असलेले नाते संपुष्टात आणल्याचे जाहीर केले. महेला जयवर्धनेच्या जागी किरॉन पोलार्डची मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर मुंबईने घेतलेला हा निर्णय क्रिकेट जगतात चर्चेचा विषय ठरला आहे.
मलिंगाचा मुंबई इंडियन्ससोबतचा प्रदीर्घ प्रवास संपुष्टात –
श्रीलंकेचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने खेळाडू म्हणून तब्बल ११ वर्षे मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले. २०१८ मध्ये तो मेंटॉर म्हणून सपोर्ट स्टाफमध्ये दाखल झाला होता, तर आयपीएल २०२४ पूर्वी शेन बाँडच्या जागी त्याने औपचारिकपणे मुख्य वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली होती. मुंबईने चार वेळा आयपीएल आणि २०११ मध्ये चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकावण्यात मलिंगाचा वाटा अत्यंत मोलाचा ठरला होता. फ्रँचायझीने एका निवेदनात मलिंगाच्या ऐतिहासिक योगदानाचे आभार मानत त्याचा वारसा सदैव संघाचा अविभाज्य भाग राहील, असे स्पष्ट केले.
पारस म्हाम्ब्रे आणि कार्ल हॉपकिन्सन यांचीही गच्छंती –
Mumbai Indians today announced that Lasith Malinga, Paras Mhambrey and Carl Hopkinson will be moving on from their respective roles in the men’s team coaching setup, thanking each of them for their commitment, contribution and service to the franchise.
Their commitment, the relationships they have built and the memories they have helped create will always be part of our journey.
We wish each of them the very best in their future endeavours.
https://t.co/iQhgBABx2W
— Mumbai Indians (@mipaltan) October 29, 2026
२०२४ मध्ये भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या सपोर्ट स्टाफचा भाग असलेले पारस म्हाम्ब्रे आयपीएल २०२५ पूर्वी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात अतिरिक्त गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून जोडले गेले होते. तर कार्ल हॉपकिन्सन २०२४ पासून संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळत होते. मात्र, नव्या हंगामाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थापनाने या दोघांनाही डच्चू देत संपूर्ण कोचिंग युनिटमध्ये फेरबदल करण्याचा मार्ग निवडला आहे.
किरॉन पोलार्डकडे सोपवली मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा –
A champion in Blue and Gold, a legend in our hearts. Thank you for being a part of our story, Slinga Malinga. 💙🥹 https://t.co/b3CLlmFBOo
— Mumbai Indians (@mipaltan) October 29, 2026
यापूर्वीच मुंबई इंडियन्सने मुख्य प्रशिक्षकपदावरून श्रीलंकेचे माजी दिग्गज खेळाडू महेला जयवर्धने यांची उचलबांगडी केली होती. त्यांच्या जागी वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू किरॉन पोलार्ड याला संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले आहे. पोलार्ड गेल्या काही हंगामांपासून संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत होता. त्याने मुंबईसाठी १८९ आयपीएल सामन्यांत १४७.३२ च्या स्ट्राईक रेटने ३,४१२ धावा आणि ६९ विकेट्स घेतल्या आहेत.
२०२७ मध्ये जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे आव्हान –
मुंबई इंडियन्स हा आयपीएलच्या इतिहासातील संयुक्तपणे सर्वात यशस्वी संघ असला, तरी २०२० नंतर त्यांना एकदाही जेतेपदाचा चषक उंचावता आलेला नाही. गेल्या काही हंगामांतील निराशाजनक कामगिरीनंतर फ्रँचायझीने संपूर्ण सपोर्ट स्टाफची फेररचना करून २०२७ मध्ये पुन्हा चॅम्पियन बनण्यासाठी पूर्णपणे नवी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.





