India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवल्यास टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना कडक इशारा

Asia Cup 2025: एशिया कप 2025 मध्ये उद्या, 14 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यावरून देशभरात नाराजी पसरली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय जनतेत पाकिस्तानविरोधात तीव्र संताप आहे. अशातच आता ठाकरे गटाने देखील सामन्याला विरोध दर्शवला आहे. भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार असा इशाराच ठाकरे गटाने दिला आहे. ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी हॉटेल चालकांना धमकीवजा इशारा दिला आहे.
नेमकं काय म्हणाले शरद कोळी
शरद कोळी म्हणाले, ‘मला महाराष्ट्रातील हॉटेल चालकांना विनंती करायची आहे की, ‘पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी भारतीयांची डोक्यात गोळ्यात हत्या केली. या पाकिस्तानसोबत मॅच होणार आहे. ती मॅच कोणत्याही हॉटेल मालक चालकांनी टीव्हीवर दाखवू नये. आपलं भारतावर प्रेम असेल, कोणीही मॅच टीव्ही किंवा स्क्रिनवर दाखवणार नाही. जर मॅच दाखवल्यास त्यांचा टीव्ही फोडण्यात येईल. त्याला जबाबदार हॉटेल मालक चालक राहतील, असं शरद कोळी म्हणाले.
पहलगाम हल्ल्यातील दु:खद आठवणी –
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता, यामध्ये कानपूर येथील शुभम द्विवेदी यांचाही समावेश होता. शुभम आपली पत्नी ऐशन्यासह पहलगामला फिरण्यासाठी गेले होते. या हल्ल्याने ऐशन्याच्या आयुष्याला कायमची कलाटणी मिळाली. त्या म्हणाल्या, “हा सामना पाहण्यासाठी कोणीही स्टेडियमवर जाऊ नये किंवा टीव्हीवरही तो पाहू नये. मला समजत नाही की लोक अजूनही हा सामना का पाहत आहेत.”
बीसीसीआयवर टीका –
ऐशन्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, “बीसीसीआयने हा सामना खेळण्यास मान्यता द्यायला नको होती. पहलगाम हल्ल्यातील 26 कुटुंबांचे आणि ऑपरेशन सिंदूरमधील शहीदांचे दुखः त्यांना जाणवत नाही का? बीसीसीआयला या कुटुंबांबद्दल कोणतीही संवेदनशीलता नाही.”





