Sports Budget 2026 : क्रिकेटपासून ऑलिम्पिकपर्यंत सर्वांनाच फायदा! कॉमनवेल्थ गेम्सच्या निधीत ७८% वाढ; पाहा खेळाडूंना काय मिळालं?
Sports Budget 2026 : क्रीडा क्षेत्राचा एकूण अर्थसंकल्प आता ४,४७९.८८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

Sports Budget 2026-27 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी मोठा खजाना खुला केला आहे. क्रीडा मंत्रालयासाठी आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या अर्थसंकल्पाची घोषणा करण्यात आली असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत यात १,१३३.३४ कोटी रुपयांची भरघोस वाढ करण्यात आली आहे. यामुळे क्रीडा क्षेत्राचा एकूण अर्थसंकल्प आता ४,४७९.८८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
स्पोर्ट्स हब बनवण्यासाठी ५०० कोटींचे विशेष पॅकेज –
यंदाच्या बजेटमध्ये प्रथमच क्रीडा साहित्य निर्मिती क्षेत्रावर (Sports Goods Manufacturing) विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. भारताला उच्च दर्जाच्या आणि किफायतशीर क्रीडा साहित्याचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीचा वापर उपकरणांचे डिझाइन, स्पोर्ट्स सायन्स मधील संशोधन आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांसाठी केला जाणार आहे.
‘खेलो इंडिया मिशन’ आणि SAI च्या निधीत वाढ –
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२६ चा क्रीडा अर्थसंकल्प जाहीर केला.
- खेलो इंडिया मिशन: सरकारने ‘खेलो इंडिया’ कार्यक्रमाचा विस्तार करत आता ‘खेलो इंडिया मिशन’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. पुढील दशकात क्रीडा क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी या मिशनसाठी ९२४.३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- SAI (भारतीय क्रीडा प्राधिकरण): राष्ट्रीय शिबिरे आणि खेळाडूंच्या प्रशिक्षणाची जबाबदारी असलेल्या ‘साई’च्या बजेटमध्ये वाढ करून ते ९१७.३८ कोटी रुपये करण्यात आले आहे.
कॉमनवेल्थ गेम्स आणि खेळाडूंसाठी खुशखबर –
VIDEO | Union Budget 2026-27: Finance Minister Nirmala Sitharaman says, “I propose to launch a Khelo India mission to transform the sports sector over the next decade. The mission will facilitate A: an integrated talent development pathway supporting supported by training centers… pic.twitter.com/ksv9Jze4km
— Press Trust of India (@PTI_News) February 1, 2026
यावर्षी ग्लासगो येथे होणाऱ्या राष्ट्रमंडल खेळांसाठी (Commonwealth Games 2026) केंद्र सरकारने मदतीमध्ये ७८% वाढ केली असून ती आता ५० कोटी रुपये करण्यात आली आहे. याशिवाय:
- प्रोत्साहन भत्ता: खेळाडूंना दिला जाणारा प्रोत्साहन भत्ता २८ कोटींवरून ४० कोटी रुपये करण्यात आला आहे.
- क्रीडा महासंघ: राष्ट्रीय क्रीडा महासंघांना (NSF) देण्यात येणारी मदत ४०० कोटींवरून ४२५ कोटी रुपये केली आहे.
- युथ हॉस्टेल: युवक वसतिगृहांच्या निधीत मोठी वाढ करण्यात आली असून ती १.१ कोटींवरून थेट १९.२० कोटींवर पोहोचली आहे.
काही क्षेत्रांत कात्री –
एकीकडे बजेट वाढले असताना, राष्ट्रीय डोप चाचणी प्रयोगशाळा (२३ कोटी), राष्ट्रीय अँटी-डोपिंग एजन्सी (२०.३० कोटी) आणि नॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी (४६.९८ कोटी) यांच्या निधीत मात्र काही प्रमाणात कपात करण्यात आली आहे.





