India Colombo Test : कोलंबोत टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खोडा तरी लंकेची अवस्था बिकट; भारताला विजयाची सुवर्णसंधी
India Colombo Test : शेवटच्या दिवशी श्रीलंकेचे उर्वरित चार फलंदाज झटपट बाद करून सामना आणि मालिका खिशात घालण्याची सुवर्णसंधी भारतासमोर आहे.

India On The Verge Of Victory In Colombo Test Against Sri Lanka Day 4 Stumps Rain Stops Play : सिंहलीज स्पोर्ट्स क्लब (SSC) मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ ऐतिहासिक विजयाच्या अगदी समीप पोहोचला आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी पावसाने व्यत्यय आणल्यामुळे खेळ वेळेआधीच थांबवण्यात आला. चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेने दुसऱ्या डावात ६ गड्यांच्या मोबदल्यात २२९ धावा केल्या असून, त्यांच्याकडे आता केवळ १६ धावांची निसटती आघाडी शिल्लक आहे. पाचव्या आणि अंतिम दिवशी श्रीलंकेचे उर्वरित चार फलंदाज झटपट बाद करून सामना आणि मालिका खिशात घालण्याची सुवर्णसंधी भारतासमोर आहे.
पडिक्कल आणि जुरेलची शतकं; भारताचा ५०३ धावांचा डोंगर!
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने ९ बाद ५०३ धावांवर पहिला डाव घोषित केला होता. ६६ धावांवर २ बाद अशी स्थिती असताना देवदत्त पडिक्कलने (११७) कर्णधार शुबमन गिलसोबत (५०) १२० धावांची भागीदारी केली. त्यानंतर दुखापतीतून सावरलेल्या ऋषभ पंतने ६३ धावा कुटल्या, तर युवा यष्टीरक्षक ध्रुव जुरेलने नाबाद ११५ धावांची मॅरेथॉन खेळी साकारून भारताला पाचशेपार नेले. श्रीलंकेकडून असिथा फर्नांडोने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
श्रीलंकेचा पहिला डाव २९० धावांत गारद; भारताने लादला फॉलोऑन!
Rain brings an early end to Day 4!
Sri Lanka 229/6 in the 2nd innings, lead by 16 runs.
Scorecard ▶️ https://t.co/r9FgXSdsMf#TeamIndia | #SLvIND pic.twitter.com/zpYEUDEU2Z
— BCCI (@BCCI) August 26, 2026
प्रत्युत्तरात सोनल दिनुषाच्या शतकी झुंजीनंतरही (१०३) श्रीलंकेचा पहिला डाव २९० धावांवर आटोपला. भारताकडून प्रसिध कृष्णा आणि मानव सुथारने प्रत्येकी ३ विकेट्स मिळवले. पहिल्या डावाच्या आधारे तब्बल २१३ धावांची भक्कम आघाडी मिळवणाऱ्या भारतीय संघाने श्रीलंकेवर फॉलोऑन लादला. भारताच्या आक्रमक गोलंदाजीसमोर लंकन फलंदाजांची पहिल्या डावात पुरती दाणादाण उडाली होती.
दुसऱ्या डावात पावसाचा खोडा; श्रीलंकेकडे केवळ १६ धावांची आघाडी!
फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात उतरलेल्या श्रीलंकेने पसिंदु सूरियाबंदारा (९२) आणि कामिंदु मेंडिस (५५) यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर डावाने होणारा पराभव टाळला. मात्र, ७२.४ षटकांत ६ बाद २२९ धावा असताना मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि खेळ थांबवावा लागला. भारताकडून मानव सुथारने २, तर सिराज, प्रसिध, सारांश आणि जडेजाने प्रत्येकी १ विकेट्स घेतली. आता शेवटच्या दिवशी विजयासाठी भारताला केवळ ४ विकेट्सची गरज आहे.





