Indapur Rainfall: इंदापूरवर अस्मानी संकट! ऑगस्ट संपला तरी पाऊस गायब; खरीप पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Indapur Rainfall: विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत झपाट्याने घट; तलाव कोरडे पडल्याने रब्बी हंगाम आणि उन्हाळ्यातील टंचाईची आतापासूनच चिंता.

Indapur Rainfall – ऑगस्ट महिना संपून निम्मा पावसाळा उलटला तरी इंदापूर तालुक्यावर अद्याप वरुणराजाची कृपादृष्टी झालेली नाही. काही भागांतील तुरळक सरी वगळता दमदार पाऊस न झाल्याने शेतातील उभी पिके पाण्याअभावी कोमेजू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. पावसाने मारलेल्या प्रदीर्घ दडीमुळे मका, सोयाबीन, बाजरी, तूर, उडीद आणि चारा पिकांची वाढ खुंटली आहे.
सध्या ही पिके फुलोरा आणि वाढीच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात असून याच काळात पावसाचा खंड पडल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. उन्हाचा तडाखा आणि जोरदार वाऱ्यांमुळे जमिनीतील ओलावा वेगाने कमी होत असल्याने पिके वाचवायची कशी, असा बिकट प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. पावसाच्या अभावाचा परिणाम केवळ शेतीवरच नाही, तर कृषीपूरक व्यवसायांवरही झाला आहे.
शेतकऱ्यांनी खते, बियाणे आणि औषधांची खरेदी थांबवल्याने कृषी सेवा केंद्र चालकांचे व्यवहार मंदीत सापडले आहेत. खरीप पिके वाचवण्यासाठी, उसाचे टनेज टिकवण्यासाठी, विहिरी-तलाव भरण्यासाठी आणि आगामी रब्बी हंगामाचा पाया रचण्यासाठी तालुक्याला आता एका दमदार पावसाची नितांत गरज आहे. शेतकरी आशेने आभाळाकडे पाहत असताना, प्रशासनाने मात्र शेतातील वास्तव परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
भूजलपातळी घटली, विहिरी कोरड्या
पावसाअभावी तालुक्यातील विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत झपाट्याने घट झाली असून अनेकांनी तळ गाठला आहे. तालुक्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या उसाला वेळेवर पाणी न मिळाल्यास आगामी गाळप हंगामात टनेज घटण्याची शक्यता आहे. याचा थेट फटका ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसणार आहे. शिवाय, तालुक्यातील तलाव, पाझर तलाव आणि सिमेंट बंधाऱ्यांमध्ये पुरेसा पाणीसाठा न झाल्याने आगामी रब्बी हंगाम आणि उन्हाळ्यातील भीषण पाणीटंचाईची चिंता आतापासूनच भेडसावू लागली आहे.
शासनाने ‘आकाशाकडे पाहा’ एवढेच सांगू नये!
पाऊस निसर्गाच्या हातात असला तरी त्यामुळे निर्माण होणाऱ्या संकटाचे व्यवस्थापन करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. कृषी विभागाने पिकांची सद्यस्थिती, भूजलपातळी आणि जलसाठ्यांचे तातडीने सर्वेक्षण करावे. पाऊस लांबल्यास पिकांचे पंचनामे, पाणी व्यवस्थापन आणि रब्बीचे नियोजन आतापासूनच करणे गरजेचे आहे. शेतकरी पूर्णपणे खचल्यानंतर पंचनाम्यांची घोषणा करण्यापेक्षा प्रशासनाने वेळेत मैदानात उतरावे, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.






