Indapur News: नीरा नदीच्या तीरावर भक्तिभावाचा महापूर! श्रावणात श्री नंदिकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी
Indapur News: श्रावण महिन्यानिमित्त नीरा नदीकाठच्या श्री नंदिकेश्वर मंदिरात महापूजा, धार्मिक विधी आणि कीर्तन सेवेचा विलोभनीय सोहळा.

Indapur News – नीरा नदीच्या पवित्र तीरावर दगडवाडी येथे वसलेले प्राचीन व जागृत देवस्थान श्री नंदिकेश्वर मंदिर सध्या श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर भक्तांच्या गर्दीने गजबजून गेले आहे. श्रावणातील पवित्र वातावरण, दररोज होणाऱ्या महापूजा, धार्मिक विधी आणि प्रत्येक सोमवारी आयोजित करण्यात येणाऱ्या कीर्तन सेवेमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
श्रावण महिन्यानिमित्त मंदिरात दररोज महापूजा व विविध धार्मिक विधी होत आहेत. प्रत्येक सोमवारी कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात येत असल्याने भाविकांना आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव मिळत आहे. यात्रा महोत्सवानिमित्त रविवारी (दि. ६) रात्री कीर्तन सेवा, तर सोमवारी (दि. ७) यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त श्री नंदिकेश्वरांची मिरवणूक तसेच विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
श्री नंदिकेश्वर मंदिराच्या विकासाला अलीकडील काळात मोठी गती मिळाली आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून देवस्थानला भरीव निधी उपलब्ध झाल्याने मंदिर परिसरातील विकासकामांना वेग आला आहे. भाविकांना आवश्यक असलेल्या विविध मूलभूत सुविधा निर्माण होत असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
धार्मिक विधींसह सामाजिक एकोपा जपणारे केंद्र
नंदिकेश्वर मंदिर हे केवळ दर्शनाचे ठिकाण नसून परिसरातील नागरिकांच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचेही एक महत्त्वाचे केंद्र आहे. विविध धार्मिक विधी, पूजा-अर्चा, कीर्तन, यात्रा आणि उत्सवांच्या माध्यमातून वर्षभर भाविकांची येथे वर्दळ असते. विशेषतः नीरा नदीच्या काठावर धार्मिक विधी करण्यासाठी इंदापूरसह माळशिरस तालुक्यातील नागरिक येत असल्याने या देवस्थानला धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे.





