Indapur Politics : इंदापुरात ‘महा’गोंधळ! आघाडी ठरेना, पण उमेदवार मैदानात! युती झाल्यास बंडखोरी अटळ?

प्रभात वृत्तसेवा
इंदापूर – इंदापूर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचे वारे जोर धरू लागले असून, अजून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील युतीबाबत अधिकृत निर्णय झाला नसतानाच इच्छुक उमेदवारांनी आपापला प्रचार सुरू केला आहे. अनेकांनी तर आपली उमेदवारी स्वतःच जाहीर केली असून, यामुळे तालुक्यातील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे.
महायुतीमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि उभा ठाकरे गट (उबाठा) हे पक्ष असले तरी, इंदापूर तालुक्यात एकत्र लढायचे की वेगळे, यावर अजूनही स्पष्ट निर्णय झालेला नाही. राज्यस्तरीय चर्चेचे फेरे सुरू असताना, स्थानिक पातळीवर इच्छुकांनी ‘वाट बघत बसण्यात अर्थ नाही’ या भावनेनेच प्रचार मोहीम हाती घेतली आहे.
त्यामुळे एका सर्कलमध्ये एकाच आघाडीचे अनेक उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता निर्माण झाली असून, यामुळे बंडखोरीची शक्यता अधिक वाढली आहे.शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. दिवाळीनंतर तत्काळ कार्यक्रम जाहीर होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यानुसार इंदापूर नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद क्षेत्रांमध्ये उमेदवारांनी घराघरांपर्यंत संपर्क मोहिमा, बॅनर, पोस्टरबाजी आणि सोशल मीडियावर प्रचार सुरू केला आहे.
राजकीय समीकरणे अजूनही अनिश्चित असल्याने मतदारांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. कोण कोणासोबत? हा प्रश्न सध्या सर्वसामान्यांच्या चर्चेचा प्रमुख विषय ठरला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या पातळीवर पक्षांतील ताणतणावही वाढू लागले असून, ऐनवेळी ‘बंडखोरी’चे फटाके फुटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
युती विलंबाचा फटका उमेदवारांना..
युतीचा निर्णय न झाल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. जर नंतर युती झाली आणि मतदारसंघांचे वाटप बदलले, तर अनेक इच्छुकांना आपली उमेदवारी मागे घ्यावी लागेल. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी वाढत असून, याच पार्श्वभूमीवर काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याच्या हालचालीही सुरू झाल्याची माहिती मिळते.
सर्वच पक्ष रणसज्ज..
इंदापूर तालुक्यातील या निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), उबाठा, मनसे, वंचित बहुजन आघाडी, आरपीआय आणि अपक्ष उमेदवार असे सर्वच राजकीय गट आणि संघटनांचे प्रतिनिधी रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे तालुक्यातील ही निवडणूक त्रिकोणी नव्हे, तर बहुकोनी होण्याची शक्यता दिसत आहे.





