Indapur News – इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथे भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्णपणे कोरडा पडल्याने शेती, पाणीपुरवठा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर संकट कोसळले आहे. विशेष म्हणजे उजनी धरणामध्ये पाणीसाठा उपलब्ध असतानाही तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हजारो एकरांवरील उभी पिके करपण्याच्या मार्गावर असून, हा प्रश्न आता केवळ कृषीपुरता मर्यादित न राहता सामाजिक व राजकीय पातळीवरही धगधगू लागला आहे. भाटनिमगाव बंधाऱ्याच्या पाण्यावर इंदापूर व माढा तालुक्यातील सुरवड, वडापुरी, अवसरी आदी भागांतील उपसा जलसिंचन योजना अवलंबून आहेत. मात्र भीमा नदीचे पात्र पूर्णतः कोरडे पडल्याने या योजना ठप्प झाल्या आहेत. परिणामी, ऊस, गहू, हरभरा यांसारखी नगदी व अन्नधान्य पिके वाचवणे कठीण झाले आहे. हजारो शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरण्याची वेळ आली असून ग्रामीण अर्थचक्र विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे. उपलब्ध माहितीनुसार, उजनी धरणात सुमारे ८८. ६० टीएमसी पाणीसाठा असून त्यापैकी उपयुक्त साठा ४६.५६ टक्के (२४.९५ टीएमसी) आहे. तरीदेखील भाटनिमगाव बंधाऱ्याकडे पाणी सोडण्यात आलेले नाही. यामुळे “पाणी आहे, पण आमच्यासाठी नाही” अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत. पाण्याचे नियोजन, वितरण आणि स्थानिक गरजांचा विचार करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका होत आहे. या परिस्थितीचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत आहे. “उजनीत पाणी असताना आमच्या शेतात कोरडेपणा आहे, ही प्रशासनाची अपयशाची पावती आहे. तातडीने पाणी सोडले नाही, तर पिकांसह आमचे आयुष्यही उद्ध्वस्त होईल.” – पपू विर, शेतकरी, भाटनिमगाव