पळसदेव : राज्यात गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या यशवंत सागरातील (उजनी धरण) वडाप व पंड्याच्या साह्याने करण्यात येणार्या मासेमारीला कायमची बंदी घालण्याची मागणी स्थानिक मच्छीमार करत आहेत. यापूर्वी अनेकदा मच्छिमारांनी निवेदनाद्वारे उजनी पाटबंधारे विभागाकडे मागणी केली आहे. तरीदेखील आर्थिक तडजोडीतून हा चोरून वडपचा गोरखधंदा सुरु आहे. धरणात गेल्या दोन वर्षात मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नांतून मोठ्या प्रमाणात मत्स्यबीज सोडण्यात आलेले आहे. याचा परिणामही सध्या दिसू लागला आहे. मच्छीमारांना मोठ्या प्रमाणात मासे मिळत आहेत; मात्र वडापचा धंदा सुरु झाल्यास पुन्हा स्थानिक मच्छीमार अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे यावर कायम बंदी व्हावी, अशी मागणी मच्छीमार करीत आहेत. उजनीत सोडलेल्या मस्त्यबीजची पूर्ण वाढ होऊन प्रजनन वाढीसाठी उजनीतील लहान मासळीची मासेमारी करण्यावर काही वर्षे बंदी आणण्याची गरज असल्याचे मत मच्छिमार व्यक्त करत आहेत. मच्छीमारांसोबत पाटबंधारे विभागाने याबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. बेकायदेशीर लहान मासळीची शिकार करणार्यांना कारवाईची भीती नसल्याने लहान मासळीची शिकार अद्याप थांबल्या नाहीत. मागे असाच प्रकारे वडापच्या साह्याने लहान मत्स्यबीजाची मोठ्या प्रमाणात शिकार झाल्याने उजनी धरणातून अनेक माशयाच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर होत्या. तर उजनीत मासे देखील सापडत नव्हते. परिणामी उजनी धरणात मासेमारी करून उपजीविका करणार्यावर उपासमारीची वेळ आली होती. अनेकांचे संसार उघड्यावर आले होते. तर अनेकांनी मासेमारी सोडून रोजंदारीने काम करण्याचा व्यवसाय पत्करला होता; मात्र त्यानंतर काही प्रमाणात वडापवर बंदी आल्यानंतर उजनीत माशांची संख्या वाढली आहे. यावर सध्या हजारो नागरिकांना रोजगार मिळत आहे. समितीचा कारभार उदासीन धरणातील लहान मासळीच्या मासेमारीला आळा घालण्यासाठी 28 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हाधिकार्यांनी जलसंपदा, महसूल, पोलीस, मत्स्यव्यवसाय विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ व स्थानिक मच्छीमार संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन लहान मासळीची मासेमारी करणार्यांवर कारवाई करण्यासाठी एक समिती गठीत केली आहे. उजनी धरणाचे कार्यकारी अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत असून, पुणे, नगर, सोलापूरचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त, दौंड, इंदापूर, माढा, करमाळा, कर्जत, श्रीगोंदा तालुक्यांचे तहसीलदार व पोलिस निरिक्षक, करमाळा, इंदापूर, भीमानगर, पळसदेव येथील भीमा उपसा सिंचन उपविभागाचे उपविभागीय अभियंता, उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे उपकार्यकारी अभियंता हे सदस्य सचिव आहेत. या समितीने संयुक्तीकपणे लहान मासळीची मासेमारी करणार्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र कारवाईच्या बाबतीत समिती उदासीन असल्याचा आरोप स्थानिक मच्छिमार करत आहेत. मासेमारीला प्रोत्साहन देणार आका कोण? परराज्यात लहान सुक्या मासळीला चांगली मागणी असून चढ्या दराने मच्छिमारांकडून अशा सुकलेल्या लहान मासळीची खरेदी होते. यातून चांगले उत्पन्न मिळत असल्याने अशा मासेमारीला काही गॉडफादर (आका) अधिक पैसे कमावण्याचे उद्देशाने आर्थिक तडजोड करून परप्रांतीय मच्छिमार मजुरांच्या साह्याने लहान मासळीची मासेमारी केली जात आहे. लहान जाळीच्या साह्याने सरसकट मासे पकडून ही नदीकाठीच वाळत घातली जाते. त्यानंतर ही मासळी सुकवून टेंपो किंवा ट्रकमधून रात्रीच्यावेळी परराज्यात पाठविली जाते. या गोरख धंद्यातून लाखोंची कमाई होत असल्याने स्थानिक मच्छिमारांवर मनगटशाहीचा जोरावर हा धंदा करत आहेत.