Indapur News : बावड्यातील ४ तासांचे भारनियमन अखेर रद्द; आंदोलनाच्या इशाऱ्याने महावितरण नरमले
Indapur News : शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला यश; इंदापूर महावितरणकडून भारनियमन मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय.

Indapur News – बावडा गावठाण फीडरमध्ये लागू करण्यात आलेले जाचक चार तासांचे भारनियमन अखेर रद्द करण्यात आले आहे. शेतकरी संघर्ष समितीने पुकारलेल्या ‘रास्ता रोको’ आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेत महावितरणने हा निर्णय मागे घेतला असून, वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समितीचे अध्यक्ष पंडितराव पाटील यांनी दिली.सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. अशा काळात सायंकाळी चार तास वीज नसल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत होता.
तसेच, अंधाराचा फायदा घेऊन चोरीच्या घटना वाढण्याची भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी पंडितराव पाटील, महादेव घाडगे, प्रसाद ढवळसकर, तुकाराम घोगरे, विजय गायकवाड तसेच सार्वजनिक प्रश्नांमध्ये सक्रिय असलेले इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, मनोज जगदाळे, गणेश घोगरे आणि विश्वजित घोगरे यांनी एकत्र येत सोमवारी (दि. २२) रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.
आंदोलनाचा इशारा मिळताच इंदापूर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता धनंजय गावडे आणि कनिष्ठ अभियंता गणेश घोलप यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली व भारनियमन रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे शेतकरी संघर्ष समितीने प्रस्तावित रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. दरम्यान, उदयसिंह पाटील यांनी हा प्रश्न माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निदर्शनास आणून दिला. हर्षवर्धन पाटील यांनी बारामती विभागाचे मुख्य अभियंता तसेच इंदापूर तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून वीजपुरवठा पूर्ववत करण्याबाबत आग्रह धरला.
त्यांच्या हस्तक्षेपामुळेही हा प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाल्याचे सांगितले जात आहे. हा प्रश्न सुटल्याने बावडा ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, मागणी आणि पुरवठ्यातील तफावत लक्षात घेता भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती ओढवू नये, यासाठी वीज ग्राहकांनी विजेचा वापर जपून करावा आणि इलेक्ट्रिक शेगडीचा वापर टाळावा, असे आवाहन शेतकरी संघर्ष समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.





