Epstein Files Protest : एपस्टीन फाइल्सवरून काँग्रेस आक्रमक! बालगंधर्व चौकात युवक काँग्रेसचे ‘रास्ता रोको’; पाहा काय घडलं?
Epstein Files Protest : एपस्टीन फाइल्समधील धक्कादायक खुलाशांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? युवक काँग्रेसचा केंद्र सरकारला थेट सवाल.

Epstein Files Protest – एपस्टीन फाइल्समधून समोर आलेल्या धक्कादायक खुलाशांवर केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणीवपूर्वक मौन बाळगत असल्याचा आरोप करत, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आज पुण्यात तीव्र निदर्शने करण्यात आली. या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी बालगंधर्व चौकात रास्ता रोको करण्यात आला.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. या वेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रस्ता रोखून धरला. आंदोलनादरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, एपस्टीन फाइल्समधील प्रकरणाने संपूर्ण जग हादरले असताना भारत सरकार यावर गप्प का आहे?

नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेसच्या वतीने बालगंधर्व चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
लोकशाहीत प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही, मात्र, सरकार सत्य दडपण्याचा आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे, असा आरोप शिवराज मोरे यांनी केला.युवक काँग्रेसचे प्रसारमाध्यम विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन यांनीही सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधानांचे मौन संशयास्पद असून, जर सत्ताधाऱ्यांना सत्याची भीती नसेल,
तर त्यांनी निष्पक्ष चौकशीची घोषणा का केली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.या आंदोलनात युवक काँग्रेसचे निरीक्षक ॲड. विवेक गावंडे, शहराध्यक्ष सौरभ अमराळे यांच्यासह अक्षय जैन, प्रथमेश आबनावे, गणेश उबाळे, राहुल शिरसाट आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
तोपर्यंत संघर्ष सुरूच…
एपस्टीन प्रकरणावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी शुक्रवारी बालगंधर्व चौकात रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी हस्तक्षेप करत काही कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्यांना सोडून दिले. दरम्यान, जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही, तोपर्यंत रस्त्यावर उतरून संघर्ष सुरूच ठेवण्याचा इशारा या वेळी युवक काँग्रेसने दिला आहे.





