Pune District : तुकाराम महाराजांच्या पालखी स्वागतासाठी इंदापूर सज्ज
Pune District : नगराध्यक्ष शहा यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व पथदिवे सुरळीत ठेवणे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी यासाठी विशेष नियोजन केले आहे.

इंदापूर : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी इंदापूर नगरी सज्ज झाली असून वारकरी बांधवांच्या सेवेसाठी नगरपरिषद प्रशासनाने नगराध्यक्ष भरत शहा यांच्या मार्गदर्शनाखाली व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली युद्ध पातळीवर तयारी पूर्ण केली आहे. पालखी सोहळा शांततापूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी दिली.
शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) परिसरात पालखीचा मुक्काम होणार असून या ठिकाणी लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा उभारल्या आहेत. पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजविणे, रिंगणस्थळाची तयारी, पालखी तळाचे सुशोभीकरण, स्वच्छता मोहीम, सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती तसेच निर्जंतुकीकरणाची कामे पूर्ण केली आहेत.
नगराध्यक्ष शहा यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व पथदिवे सुरळीत ठेवणे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी यासाठी विशेष नियोजन केले आहे. पालखी कालावधीत पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विहिरींचे निर्जंतुकीकरण केले आहे.
पालखी मुक्कामस्थळी मंडप, स्टेज, विद्युत व्यवस्था, शौचालये, स्नानगृहे, निवारा केंद्रे आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. नगरपरिषदेचे १०४ अधिकारी व कर्मचारी वारकरी सेवेसाठी कार्यरत असून प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
निर्मल वारीसाठी तात्पुरती शौचालये
निर्मल वारी’ संकल्पना यशस्वी करण्यासाठी शहरातील विविध २० ठिकाणी तात्पुरत्या शौचालयांची उभारणी करण्यात येत आहे. याशिवाय नगरपरिषदेच्या १३ सार्वजनिक शौचालयांचा वापर वारकऱ्यांसाठी खुला ठेवण्यात येणार आहे.
वारकऱ्यांसाठी ६ ठिकाणी पाणी भरणा केंद्रे
पालखीसोबत येणाऱ्या दिंड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी शहरात सहा ठिकाणी टँकर भरणा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. या केंद्रांमधून दहा टँकरच्या माध्यमातून वारकऱ्यांना पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच पालखी तळावर महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्नानगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. पालखी तळ परिसरात नगरपरिषदेमार्फत २४ तास कार्यरत राहणारा आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे.
‘हरित वारी-सुरक्षित वारी’चा संदेश
यंदाच्या पालखी सोहळ्यात ‘हरित वारी-सुरक्षित वारी’ या उपक्रमावर विशेष भर देण्यात आला आहे. वारकऱ्यांच्या हस्ते विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असून पालखी मार्गावर कचरा संकलनासाठी विशेष पेट्या ठेवण्यात येणार आहेत. प्लास्टिकमुक्त, तंबाखूमुक्त आणि स्वच्छ शहराचा संदेश देत पर्यावरण संवर्धनाचा जागर यानिमित्ताने करण्यात येणार आहे. पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी शहरातील नागरिक, सामाजिक संस्था आणि सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष भरत शहा, मुख्याधिकारी रमेश ढगे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, सभापती सागर अरगडे तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविकांनी केले आहे.





