IND vs WI 3rd T20I : टीम इंडियाचा 2-1 ने मालिका विजय, तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा 60 धावांनी उडवला धुव्वा….

India Women vs West Indies Women 3rd T20 : ऑस्ट्रेलियाकडून टी-20 मालिकेत दारूण पराभव पत्करावा लागलेला भारतीय महिला क्रिकेट संघ विजयी मार्गावर परतला आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात 60 धावांच्या फरकाने मोठा विजय नोंदवला आणि यासह 3 सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली.
भारत आणि वेस्ट इंडिज महिला संघांदरम्यान सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा निर्णायक सामना आज, गुरुवार, 19 डिसेंबर रोजी डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी, नवी मुंबई येथे खेळला गेला. या सामन्यात कर्णधारपद भूषवणाऱ्या टीम इंडियाने स्मृती मंधाना आणि ऋचा घोष यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर 217 धावांची विक्रमी धावसंख्या उभारली होती आणि त्यानंतर वेस्ट इंडिजला 157 धावांवर रोखून सामन्यासह मालिकाही जिंकली.
🇮🇳 𝟐-𝟏 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬 𝐬𝐞𝐚𝐥𝐞𝐝!
India secures the 3-match series against West Indies, thanks to the explosive batting and a stellar bowling performance in the 3rd T20I! #CricketTwitter #INDvWI pic.twitter.com/y9ir4ETdky
— Female Cricket (@imfemalecricket) December 19, 2024
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 217 धावा केल्या. मात्र, भारताला पहिल्या षटकात उमा छेत्री (0) च्या रूपाने पहिला धक्का बसला, मात्र कर्णधार स्मृती मंधाना (47 चेंडूंत एक षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने 77 धावा)च्या अप्रतिम खेळीमुळे भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला.
याशिवाय संघाकडून जेमिमाह रॉड्रिग्जने 39 आणि राघवी बिश्तने 31 धावांची खेळी केली तर अखेरीस यष्टीरक्षक रिचा घोषने शानदार फलंदाजी करत 21 चेंडूंत 3 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 54 धावांची शानदार खेळी केली. तर कॅरेबियन संघाच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास, चॅनेल हेन्री, डीआंद्रे डॉटिन, आलिया अलयन आणि एफी प्लेचर यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला.
IND W v WI W 3rd T20 : स्मृती मंधानाने ठोकले 30 वे अर्धशतक, टी-20 कारकिर्दीत केला नवा विक्रम…
दुसरीकडे, भारताने दिलेल्या 218 धावांच्या भक्कम लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी वेस्ट इंडिज मैदानात उतरला तेव्हा त्यांना 20 षटकांत 9 विकेट्स गमावून 157 धावाच करता आल्या आणि त्यांना या सामन्यात 60 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. वेस्ट इंडिजसाठी फक्त चॅनेल हेन्री 43 धावांची सर्वोत्तम खेळी करू शकली. याशिवाय अन्य कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी खेळता आली नाही. भारतीय संघाकडून उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली. अनुभवी फिरकीपटू राधा यादवने 4 बळी घेतले, तर रेणुका सिंग, सजना सजीवन, तितास साधू आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.





