Abhishek Sharma Century IND vs ZIM 2nd T20 Match : झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सलामीवीर अभिषेक शर्माने दुसऱ्या टी-20मध्ये दमदार फलंदाजी केली. अभिषेकने 47 चेंडूंत सात चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने 100 धावाची खेळी केली. भारतासाठी अभिषेकचे हे पहिले शतक आहे. शनिवारी झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अभिषेक शून्यावर बाद झाला होता. यासह अभिषेक झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे, तर तो आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वात कमी डावात शतक झळकावणाराही फलंदाज बनला आहे.
दीपक हुडाला टाकलं मागे…
अभिषेकने आपल्या शानदार खेळीने अनेक विक्रम केले. झिम्बाब्वेविरुद्ध भारतासाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या बनवण्याबरोबरच, टी-20 मध्ये सर्वात कमी डावात शतक ठोकण्याच्या बाबतीत त्याने दीपक हुडाला मागे टाकले आहे. अभिषेकने भारतासाठी या फॉरमॅटमधील पहिले शतक अवघ्या दोन सामन्यात झळकावले आहे. याआधी, हा विक्रम दीपक हुडाच्या नावावर होता ज्याने तिसऱ्या टी20 सामन्यात पहिले शतक झळकावले होते, तर केएल राहुलने चौथ्या डावात ही कामगिरी केली होती.
टी-20 मध्ये भारतासाठी तिसरे वेगवान शतक
अभिषेकने 46 चेंडूत शतक झळकावले, जे भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय संघातील संयुक्त तिसरे जलद शतक आहे. भारतासाठी या फॉरमॅटमध्ये कमी चेंडूत शतक ठोकण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे, ज्याने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 35 चेंडूत शतक पूर्ण केले होते. त्याचवेळी, सूर्यकुमार यादवने 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 45 चेंडूत शतक झळकावले होते. अभिषेकशिवाय केएल राहुलने 2016 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 46 चेंडूत शतक पूर्ण केले होते.
टी20 मध्ये भारतासाठी शतक झळकावणारा चौथा युवा फलंदाज
अभिषेक शर्माने 23 वर्षे 307 दिवस वयामध्ये टी20 मध्ये भारतासाठी शतक केले आणि शतक झळकावणारा तो चौथा युवा भारतीय फलंदाज आहे. भारतासाठी सर्वात तरुण शतक झळकावण्याचा विक्रम यशस्वी जैस्वालच्या नावावर आहे, ज्याने 2023 मध्ये नेपाळविरुद्ध 21 वर्षे 279 दिवस इतके वय असताना या फॉर्मेटमध्ये भारतासाठी शतक झळकावले होते. या यादीत शुभमन गिल आणि सुरेश रैना यांचाही समावेश आहे. गिलने गेल्या वर्षी वयाच्या 23 वर्षे 146 दिवसांत न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावले होते, तर रैनाने 2010 मध्ये 23 वर्षे 156 दिवसांच्या वयात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावले होते.
यशस्वी जैस्वाल – 21 वर्षे 279 दिवस
शुभमन गिल – 23 वर्षे 146 दिवस
सुरेश रैना – 23 वर्षे 156 दिवस
अभिषेक शर्मा – 23 वर्षे 307 दिवस
षटकार मारण्याच्या बाबतीत रोहितला टाकले मागे
अभिषेकने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात एकूण आठ षटकार ठोकले आणि यासह तो एका वर्षात टी-20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज बनला. अभिषेकने या वर्षात आतापर्यंत 47 षटकार मारले आहेत, तर नुकतेच त्याच्या नेतृत्वाखाली भारताला टी-20 विश्वचषक चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्माने 46 षटकार मारले आहेत. विराट कोहलीने 2024 मध्ये एकूण 45 षटकार मारले होते.
टी-20 मधील सर्वोत्तम भागीदारी…
अभिषेकने रुतुराज गायकवाडसह दुसऱ्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी केली, जी भारतासाठी झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 मधील सर्वोत्तम भागीदारी आहे. त्याचबरोबर टी-20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा 10वा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी रोहित शर्मा 5, सूर्यकुमार यादव 4, के.एल.राहुल 2, विराट कोहली 1, शुबमन गिल 1, दीपक हुड्डा 1, सुरेश रैना 1, यशस्वी जैस्वाल 1, ऋतुराज गायकवाड 1, अभिषेक शर्मा 1 यांनी शतके झळकावली आहेत.