IND vs SA : भारताचा आफ्रिकेवर ‘विराट’ विजय! मालिका ३-१ ने खिशात; हार्दिक-तिलकसह वरुण ठरला विजयाचा शिल्पकार

IND vs SA India beat South Africa T20I Series : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ३० धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने ५ सामन्यांची ही मालिका ३-१ अशा फरकाने आपल्या नावावर केली आहे. टी-२० विश्वचषक २०२४ नंतर भारतीय संघाचा या फॉरमॅटमधील हा सलग सातवा द्विपक्षीय मालिका विजय ठरला आहे.
हार्दिक आणि तिलकची स्फोटक फलंदाजी –
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने निर्धारीत २० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात २३२ धावांचा विशाल डोंगर उभा केला. भारताच्या या मोठ्या धावसंख्येत तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या यांचा सिंहाचा वाटा होता. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या तिलक वर्माने ४२ चेंडूंत ७३ धावांची शानदार खेळी केली. तर, हार्दिक पंड्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा समाचार घेत अवघ्या २५ चेंडूंत ६३ धावा चोपल्या. तत्पूर्वी सलामीवीर संजू सॅमसन (३७) आणि अभिषेक शर्मा (३४) यांनीही संघाला भक्कम सुरुवात करून दिली होती.
Rising to the occasion again! 🫡
Hardik Pandya is the Player of the Match for his scintillating performance in Ahmedabad 🔥
Scorecard ▶️ https://t.co/kw4LKLNSl3#TeamIndia | #INDvSA | @hardikpandya7 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/qZh0SUZePz
— BCCI (@BCCI) December 19, 2025
वरुण चक्रवर्तीने दाखवली फिरकीची जादू –
२३३ धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अत्यंत वेगवान झाली होती. क्विंटन डी कॉक आणि रीझा हेंड्रिक्स यांनी ६ षटकांत ६७ धावा कुटल्या होत्या. मात्र, *वरुण चक्रवर्तीने हेंड्रिक्सला बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर धोकादायक ठरू पाहणाऱ्या डी कॉकला (६५ धावा) *जसप्रीत बुमराहने बाद करत आफ्रिकेला मोठा धक्का दिला.
हेही वाचा – IND vs SA : हार्दिकचं विक्रमी अर्धशतक अन् गर्लफ्रेंड माहिकाला फ्लाईंग किस, VIDEO होतोय व्हायरल
एका टप्प्यावर ११८ धावांवर २ बाद असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा डाव १३५ धावांपर्यंत पोहोचेपर्यंत निम्मा संघ गारद झाला. वरुण चक्रवर्तीने ५३ धावा देत ४ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराहने आपल्या ४ षटकांत अत्यंत कंजूष गोलंदाजी करत केवळ १७ धावा दिल्या आणि २ गडी बाद केले. अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली. दक्षिण आफ्रिकेचा संघ २० षटकांत ९ बाद २०१ धावांपर्यंतच मजल मारू शकला.
हेही वाचा – IND vs SA : सॅमसनचा मोठा धमाका! टी-२० क्रिकेटमध्ये केला खास पराक्रम; विराट-रोहितच्या क्लबमध्ये मारली एन्ट्री
भारताचा मालिका विजयाचा रथ सुसाट –
Another series sealed ✅
A convincing win by 3⃣0⃣ runs in Ahmedabad 👏
With that, #TeamIndia clinch the T20I series by 3⃣-1⃣ 🏆
Scorecard ▶️ https://t.co/kw4LKLNSl3#INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/PqcC83lgnP
— BCCI (@BCCI) December 19, 2025
या विजयासह भारतीय युवा संघाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मालिकेतील सातत्यपूर्ण कामगिरी आणि निर्णायक सामन्यातील सांघिक खेळामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच भूमीत धूळ चारली आहे. या मालिकेत भारताने पहिला, तिसरा आणि पाचवा टी-२० सामना जिंकला, तर दक्षिण आफ्रिकेने फक्त दुसरा टी-२० सामना जिंकला. तसेच चौथा सामना धुक्यामुळे रद्द झाला होता.





