Team India : टीम इंडियाला मालिका विजयानंतर मोठा झटका! ICC ने केली मोठी कारवाई, नेमकं कारण काय? जाणून घ्या

ICC fines India for slow over rate : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका नुकतीच पार पडली, ज्यात टीम इंडियाने २-१ ने शानदार विजय मिळवला. कसोटी मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघाने वनडेत जोरदार पुनरागमन केले खरे, पण या विजयानंतरही संघाला मोठा फटका बसला आहे. आयसीसीने दुसऱ्या वनडेतील एका चुकीसाठी भारतीय संघावर १० टक्के मॅच फी चा दंड ठोठावला आहे. ते प्रकरण नेमकं काय आहे? जाणून घेऊया.
आयसीसीने का ठोठावला दंड?
३ डिसेंबर २०२५ रोजी रायपूर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ निर्धारित वेळेत आपले षटके पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे आयसीसीच्या एलिट पॅनलचे मॅच रेफ्री रिची रिचर्डसन यांनी नियमांचे उल्लंघन झाल्याचे नमूद केले. रिपोर्टनुसार, केएल राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ वेळेनुसार दोन षटके मागे होता. आयसीसीच्या आचारसंहितेच्या ‘कलम २.२२’ नुसार, प्रत्येक षटकासाठी ५ टक्के मॅच फी कापण्याची तरतूद आहे. त्यानुसार, दोन षटके मागे राहिल्यामुळे भारतीय खेळाडूंवर एकूण १० टक्के मॅच फीचा दंड आकारण्यात आला.
कर्णधार केएल राहुलने मान्य केली चूक –
India fined for breach of ICC Code of Conduct against South Africa 👀https://t.co/CZO3nv5rcR
— ICC (@ICC) December 8, 2025
या संपूर्ण प्रकरणावर कर्णधार केएल राहुलने आपली चूक मान्य केली आहे. त्याने स्लो ओव्हर रेटच्या नियमाचे उल्लंघन झाल्याचे कबूल केले आणि कोणतीही हरकत न घेता दंड भरण्यास सहमती दर्शवली. तसे पाहता, टीम इंडियावर स्लो ओव्हर रेटबद्दल फार कमी वेळा दंड लागतो, पण यावेळी वेळेच्या गणितात झालेली चूक संघाला महागात पडली. वारंवार घेतलेले ड्रिंक्स ब्रेक, क्षेत्ररक्षणातील बदल आणि काही मेडिकल ब्रेक्समुळे ओव्हर रेटवर परिणाम झाला, असे क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेचा आढावा –
या मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय संघाने कसोटी मालिकेतील पराभवाचे उत्तर वनडेत दमदार कामगिरीने दिले. रांची येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने १७ धावांनी विजय मिळवत चांगली सुरुवात केली. रायपूर येथील दुसरा सामना मात्र आफ्रिकेने ३५९ धावांचे मोठे लक्ष्य चार विकेट्स राखून पूर्ण करत जिंकला.
हेही वाचा – Jemimah Rodrigues : स्मृती-पालाशचं लग्न रद्द झाल्यानंतर जेमिमाची ‘बी द मॅन आय नीड’ स्टोरी चर्चेत
परंतु, वाईजॅग येथे झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडेत टीम इंडियाने ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवत २-१ ने मालिका खिशात घातली. एकूणच, भारताने मालिका जिंकून आत्मविश्वास वाढवला, पण स्लो ओव्हर रेटच्या या चुकीमुळे विजयाची चमक थोडी फिकी पडल्याचे दिसत आहे.





