PAK T20 Captain : टी-२० विश्वचषकापूर्वी ICCने पाकिस्तानकडे केले दुर्लक्ष, अपमान झाल्याने संतप्त PCB ने केली तक्रार

ICC Ignored PAK T20 Captain : आगामी टी-२० विश्वचषक २०२६ या स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. भारत आणि श्रीलंका येथे आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नुकतेच प्रमोशन पोस्टर जारी केले. मात्र, या पोस्टरमध्ये पाकिस्तानच्या टी-२० संघाचा कर्णधार सलमान अली आगाला स्थान न मिळाल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे हा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे. याआधी काही महिन्यांपूर्वी आशिया चषकावेळीही पाकिस्तान संघाची अशीच अवस्था झाली होती. आता पुन्हा एकदा विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेच्या आधी हीच स्थिती निर्माण झाल्याने पीसीबीने संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर आयसीसीने आपल्या कर्णधाराकडे दुर्लक्ष केल्याने पीसीबीने याबाबत अधिकृत तक्रार केली आहे.
आयसीसीने पाकिस्तानी कर्णधाराकडे केले दुर्लक्ष –
The tickets for the #T20WorldCup 2026 in India and Sri Lanka, beginning 7 February, are live 🎟️🤩
More on how to book yours ⬇️https://t.co/OWVz06Rqla
— ICC (@ICC) December 13, 2025
आयसीसीने नुकतेच टी-२० विश्वचषक २०२६ चे अधिकृत पोस्टर जारी केले, ज्यामध्ये पाच प्रमुख संघांचे कर्णधार दिसत होते. या पोस्टरमध्ये भारताचा सूर्यकुमार यादव, दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम, ऑस्ट्रेलियाचा मिचेल मार्श, श्रीलंकेचा दासुन शनाका आणि इंग्लंडचा हॅरी ब्रूक यांचा समावेश होता. परंतु, पाकिस्तान टी-२० संघाचा कर्णधार सलमान अली आगा याला या पोस्टरमध्ये स्थान देण्यात आले नव्हते.
हेही वाचा – IND vs SA : गंभीर-पंड्या यांच्यात ड्रेसिंग रूममध्ये जोरदार खडाजंगी? व्हायरल व्हिडिओने खळबळ!
पीसीबीची आयसीसीकडे अधिकृत तक्रार
पीसीबीच्या एका सूत्राने ‘टीओआय’ला सांगितले की, “काही महिन्यांपूर्वी आशिया चषकातही आम्हाला हीच समस्या आली होती. त्यावेळी प्रसारकाने प्रमोशनल मोहीम सुरू केली होती, पण त्यात आमच्या कर्णधाराचा समावेश नव्हता. पुन्हा एकदा आम्ही त्याच परिस्थितीत आहोत, जिथे आयसीसीने तिकीट विक्रीच्या प्रमोशनल पोस्टरमध्ये आमच्या कर्णधाराला स्थान दिले नाही.” या सूत्राने पुढे सांगितले की, आशिया चषकावेळी जेव्हा अशी परिस्थिती उद्भवली होती, तेव्हा एसीसीने त्यांची समस्या सोडवली होती.
पाकिस्तानच्या कर्णधारा का मिळाले नाही स्थान?
आता पीसीबी आयसीसीकडूनही अशाच सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा करत आहे. टी-२० क्रमवारीत पाकिस्तान सध्या ‘टॉप ५’ मध्ये नसल्यामुळे त्यांना पोस्टरमध्ये जागा मिळाली नसावी, असा एक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, क्रिकेटमधील पाकिस्तानचा वारसा मोठा असून, विश्वचषकात ते मुख्य आकर्षण असतात, असे पीसीबीचे मत आहे. त्यामुळे आयसीसी भविष्यात आपल्या कर्णधाराला प्रमोशनल पोस्टर्समध्ये स्थान देईल, अशी अपेक्षा पीसीबी व्यक्त करत आहे.





