IND vs PAK : इंडिया – पाकिस्तान फायनलमध्ये भिडणार? कसे ते जाणून घ्या..

युएईमध्ये सुरू असलेल्या आशिया कपच्या सुपर-4 टप्प्यात भारताने पहिल्या सामन्यात (IND vs PAK) पाकिस्तानला 6 विकेट्स राखून पराभूत करत विजयी सलामी दिली. या पराभवानंतर पाकिस्तान (IND vs PAK) पॉइंट्स टेबलच्या तळाशी घसरला असून, त्यांच्याकडे एका सामन्यात शून्य गुण आणि -0.689 चा नेट रनरेट आहे. तरीही, पाकिस्तानला सुपर-4 मध्ये पुनरागमनाची संधी आहे, कारण त्यांना अजून दोन सामने खेळायचे आहेत. जर पाकिस्तानने या संधीचे सोने केले, तर फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानच्या फायनलमधील प्रवेशाचे समीकरण
पाकिस्तानला सुपर-4 मध्ये 23 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध आणि 25 सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध सामने खेळायचे आहेत. जर पाकिस्तानने हे दोन्ही सामने जिंकले, तर त्यांचे 4 गुण होतील, ज्यामुळे ते फायनलसाठी पात्र ठरू शकतात. दुसरीकडे, भारताने पाकिस्तानवर मात केल्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. भारताकडे एका सामन्यात 2 गुण आहेत. भारताला आता 24 सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध आणि 26 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध सामने खेळायचे आहेत. यापैकी एक सामना जिंकला, तरी भारताचे 4 गुण होतील.
जर भारत आणि पाकिस्तान दोघांनीही आपले उर्वरित दोन-दोन सामने जिंकले, तर हे दोन्ही संघ 4-4 गुणांसह फायनलमध्ये प्रवेश करतील. अशा परिस्थितीत भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा हायव्होल्टेज सामना रंगण्याची शक्यता आहे. दोन्ही संघांचे उर्वरित सामने कोण जिंकते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हॅरिस रौफच्या पत्नीची वादग्रस्त पोस्ट
भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफच्या पत्नीने इंस्टाग्रामवर एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. आम्ही सामना हरलो असू, पण लढाई आम्ही जिंकली आहे,अशी वादग्रस्त पोस्ट तिने केली आहे. हॅरीसची बायको या पोस्टमधून सांगते की मॅच हरलो पण युद्धातली लढाई जिंकलो,असाच होतोय. त्यामुळे या पोस्टनंतर आणखी वाद पेटण्याची शक्यता आहे.
हॅरिस रौफचे मैदानावरील वादग्रस्त वर्तन
भारताविरुद्धच्या सामन्यात हॅरिस रौफचे वर्तनही चर्चेचा विषय ठरले. सामन्यादरम्यान त्याचा भारताच्या सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांच्याशी मैदानावर वाद झाला. यानंतर हॅरिसने विमानाच्या स्फोटाचे अनुकरण करणारी वादग्रस्त कृती केली. यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.
आशिया कपच्या सुपर-4 टप्प्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत तितकीच रोमांचक ठरणार आहे. पाकिस्तानला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी उर्वरित सामने जिंकणे आवश्यक आहे, तर भारताला फक्त एका विजयाची गरज आहे.आता सर्वांचे लक्ष या दोन्ही संघांच्या पुढील सामन्यांवर असणार आहे. त्यामुळे आता भारत – पाकिस्तान फायनलमध्ये आमने – सामने येणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





