Asia Cup 2025 : आशिया कप सुपर फोरचे संघ ठरले! कोणाचा, कधी अन् कोणाविरुद्ध होणारा सामना? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Asia Cup 2025 Super 4 Schedule : आशिया कप 2025 चा अंतिम लीग सामना आज भारत आणि ओमान यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वीच सुपर-4 साठी चार संघ निश्चित झाले असून त्यांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. सुपर-4 चे सामने 20 सप्टेंबरपासून सुरू होणार असून, 21 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा रोमांचक सामना रंगणार आहे. टूर्नामेंटचा अंतिम सामना 28 सप्टेंबरला होणार आहे.
सुपर-4 मध्ये कोणत्या संघांनी मिळवली जागा?
11 लीग सामन्यांनंतर भारत, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश या चार संघांनी सुपर-4 मध्ये स्थान मिळवले आहे. भारताने सर्वप्रथम सुपर-4 मध्ये प्रवेश केला, त्यानंतर श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश यांनी आपली जागा पक्की केली. सुपर-4 चे सामने 20 ते 26 सप्टेंबर या कालावधीत खेळले जाणार असून, 28 सप्टेंबरला दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर अंतिम सामना रंगेल.
भारताचा शानदार प्रवास –
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली गतविजेत्या भारतीय संघाने ग्रुप ए मधून पहिल्यांदा सुपर-4 मध्ये प्रवेश केला. भारताने आपल्या मोहिमेची सुरुवात युएईविरुद्ध 9 गडी राखून दमदार विजयाने केली. त्यानंतर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 7 गडी राखून शानदार विजय मिळवला. युएईने ओमानचा पराभव केल्यानंतर भारताचा सुपर-4 मधील प्रवेश निश्चित झाला.
हेही वाचा – Asia Cup 2025 : मोहम्मद नबीने एकाच षटकात ५ षटकार ठोकत रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू
पाकिस्तानचीही मजल –
ग्रुप ए मधून भारतासोबत पाकिस्ताननेही सुपर-4 मध्ये स्थान मिळवले. ओमानविरुद्ध विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात करणाऱ्या पाकिस्तानने युएईविरुद्ध 41 धावांनी विजय मिळवत आपली क्वालिफिकेशनची आशा कायम ठेवली. भारताकडून पराभव स्वीकारल्यानंतर त्यांनी युएईविरुद्ध शानदार पुनरागमन केले.
श्रीलंका आणि बांगलादेश ग्रुप बी मधून पुढे –
ग्रुप बी मधून श्रीलंका आणि बांगलादेश यांनी सुपर-4 मध्ये प्रवेश केला. चरिथ असलंकाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने आपले तिन्ही लीग सामने जिंकून गटात अव्वल स्थान मिळवले. गुरुवारी श्रीलंकेकडून पराभव पत्करल्यानंतर अफगानिस्तान स्पर्धेतून बाहेर पडला आणि बांगलादेशने सुपर-4 मध्ये स्थान मिळवले.
हेही वाचा – IND W vs AUS W : ऑस्ट्रेलिया महिला संघाला दंड! भारताविरुद्धच्या पराभवानंतर ICC ची कारवाई, नेमकं कारण काय?
आशिया कप २०२५ मधील सुपर-4 चे वेळापत्रक (सर्व सामने रात्री आठला) :
- 20 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध बांगलादेश – दुबई
- 21 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान – दुबई
- 23 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका – अबुधाबी
- 24 सप्टेंबर – भारत विरुद्ध बांगलादेश – दुबई
- 25 सप्टेंबर -पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश – दुबई
- 26 सप्टेंबर – भारत विरुद्ध श्रीलंका – दुबई
- 28 सप्टेंबर -अंतिम सामना (टीबीसी विरुद्ध टीबीसी) -दुबई





