IND vs NZ ODI Series 2024 (Indian Women Team Squad) : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड महिला संघ यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका 24 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्याचवेळी, बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी 16 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषकातून साखळी फेरीतूनच बाहेर पडल्यानंतरही हरमनप्रीत कौरकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी स्मृती मंधानाकडे सोपविण्यात आली आहे.
टी-20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघ साखळी फेरीमधून बाहेर पडल्यानंतर, हरमनप्रीत कौरकडून संघाचे कर्णधारपद काढून घेतले जाऊ शकते अशी अटकळ होती. मात्र, हरमनप्रीत कर्णधारपदी कायम आहे. रिचा घोषला संघात स्थान देण्यात आलेले नाही. वास्तविक, रिचा तिचे 12वीचे पेपर देणार आहे आणि त्यामुळेच तिला संघात संधी देण्यात आलेली नाही. आशा शोभना हिलाही दुखापतीमुळे संघात स्थान मिळालेले नाही. त्याचबरोबर दुखापतीमुळे पूजा वस्त्राकरलाही या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
तीन युवा खेळाडूंना मिळाली संधी…
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी तीन युवा खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे. प्रिया मिश्रा, सायमा ठाकूर आणि तेजल हसब्रिस यांना पहिल्यांदाच भारतीय संघात संधी मिळाली आहे. टी-20 विश्वचषकात बॅटने अप्रतिम कामगिरी केली नसली तरी जेमिमा रॉड्रिग्स संघात कायम आहे. यस्तिका भाटिया यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत उमा छेत्रीलाही संघात स्थान देण्यात आले आहे.
मालिकेचे वेळापत्रक…
भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेतील पहिला सामना 24 ऑक्टोबरला तर दुसरा सामना 27 ऑक्टोबरला असेल. तर मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना 29 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. तसेच भारत-न्यूझीलंड मालिकेतील हे तिन्ही वनडे सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच खेळवले जातील. तिन्ही सामने हे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होतील.
A look at #TeamIndia’s squad for the three-match ODI series against New Zealand 👌👌 #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/pKxdLCWsnb
— BCCI Women (@BCCIWomen) October 17, 2024
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :- हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दयानिधी हेमलता, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), उमा छेत्री (विकेटकीपर), सायली सतगरे, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, तेजल हसबनीस, सायमा ठाकोर, प्रिया मिश्रा, राधा यादव आणि श्रेयंका पाटील.