IND vs NZ : मालिका जिंकल्यानंतर टीम इंडिया ऑकलंडमध्ये करणार मोठे बदल; ‘या’ दोन खेळाडूंना मिळणार संधी
IND vs NZ : मालिकेत अभेद्य आघाडी असल्याने भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात बदल करू शकतो. तंदुरुस्तीअभावी इशान किशन दुसरा आणि तिसरा सामना खेळला नव्हता.

Kuldeep Yadav and Varun Chakravarthy May Play in 4th T20 vs New Zealand in Auckland : न्यूझीलंडविरुद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिका ३-० ने खिशात घातल्यानंतर भारतीय संघ आता शुक्रवारी ऑकलंड येथे होणाऱ्या चौथ्या सामन्यात आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे प्रयोग करण्याची दाट शक्यता आहे. आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी ठेवण्याच्या संघ व्यवस्थापनाच्या रणनीतीमुळे चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव आणि मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती यांना गेल्या काही महिन्यांत बेंचवर बसावे लागले होते. आता मालिका जिंकल्याने कोणताही दबाव नसल्यामुळे या दोघांना मैदानात उतरवून गोलंदाजीची ताकद अजमावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कुलदीप आणि वरुणच्या पुनरागमनाची शक्यता; फलंदाजीचा अट्टाहास सोडणार?
कुलदीपला आणखी काळ बाहेर ठेवल्यास त्याच्या आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो; मात्र त्याला संधी देण्यासाठी भारताला तळापर्यंत फलंदाजी खेळवण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल. तिसऱ्या सामन्यात अक्षर पटेल आणि नमन धीर यांना गोलंदाजीचीही संधी मिळाली नव्हती. दुसरीकडे, अक्षर या मालिकेत ९.५८ च्या इकॉनॉमीने धावा देत महागडा ठरला आहे, तर वरुण चक्रवर्तीलाही आपला हरवलेला फॉर्म पुन्हा मिळवण्याचे आव्हान असेल. अशा स्थितीत कुलदीपची मधल्या षटकांत विकेट्स घेण्याची क्षमता भारतासाठी फायदेशीर ठरू शकते.
गोलंदाजीत बदल: मयंक यादव की प्रिन्स यादव?
Gearing up for the next challenge!
Team India hit the nets at Eden Park, Auckland, ahead of the 4th T20I against New Zealand. 💪🔥
#TeamIndia #NZvsIND https://t.co/TTCLGNYvxp
— Doordarshan Sports (@ddsportschannel) October 29, 2026
वेगवान आक्रमणात चार वर्षांनंतर परतलेल्या भुवनेश्वर कुमारने वेलिंग्टनमध्ये अखेरच्या षटकात उत्कृष्ट यॉर्कर्स टाकले असले, तरी तीन सामन्यांत त्याने १३९ धावा खर्च केल्या आहेत. त्यातच गेल्या दोन सामन्यांत मयंक यादवऐवजी प्रभावी ठरलेल्या नवोदित प्रिन्स यादवला संधी देण्यात आली होती. आता ऑकलंडमध्ये मयंक यादवचे पुनरागमन होते की संघ व्यवस्थापन प्रिन्स यादववरच विश्वास कायम ठेवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इशान किशनच्या फिटनेसवर सस्पेन्स; न्यूझीलंडचे गोलंदाज जायबंदी
ग्रॉईनच्या दुखापतीमुळे इशान किशन गेल्या दोन सामन्यांना मुकला होता; तो चौथ्या टी-२० साठीही तंदुरुस्त नसल्यास १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला अभिषेक शर्मासोबत सलामीची आणखी एक संधी मिळू शकते. न्यूझीलंडसाठी भारताच्या स्फोटक अव्वल फळीला रोखणे सर्वात मोठे आव्हान ठरले आहे. त्यातच मॅट हेन्रीनंतर लॉकी फर्ग्युसनही दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडल्याने किवी गोलंदाजी आणखी कमकुवत झाली आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १२:३० वाजता सुरू होईल.





