IND vs NZ 2nd Test : टीम इंडियाचे तब्बल 12 वर्षांनी मायदेशात वाजले बारा, भारतात प्रथमच किवींचा मालिका विजय…

IND vs NZ 2nd Test : – तब्बल १२ वर्षांच्या कालखंडानंतर भारतीय संघाला मायदेशात पराभूत करण्याचा विक्रम किवी संघाने करून दाखविला. किवींना दुसरी कसोटी तिसऱ्याच दिवशी जिंकून देण्यात मिचेल सँटनरची महत्वपूर्ण भूमिका राहिली. सँटनरने दोन्ही डावात मिळून भारताच्या १३ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखविला. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरनेही ११ गडी बाद करण्याची किमया केली. सुंदर वगळाता एकाही भारतीय खेळाडूला मैदानावर चांगली कामगिरी करता न आल्याने तब्बल १२ वर्षांनंतर भारताला मायदेशात मालिका गमवावी लागली. यामध्ये आघाडीच्या फलंदाजांचे अपयश हे सर्वाधिक अधोरेखित झाले. सँटनरला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
न्यूझीलंडचा डाव…
दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने ५ बाद १९८ धावांपर्यंत मजल मारताना ३०१ धावांची भलीमोठी आघाडी घेतली होती. काल दिवसअखेर नाबाद असणारे, टॉम ब्लंडेल (३०) व ग्लेन फिलिप (९) यांनी तिसऱ्या दिवशी खेळायला सुरुवात केली. टॉम ब्लंडेल ४१ धावांची खेळी करून बाद झाला. त्यानंतर अश्विन आणि जडेजाने न्यूझीलंडचे शेपूट झटपट गुंडाळले. मिचेल सँटनर (४), टीम साऊदी (०), एजाज पटेल (१) व विल्यम ओ’रुके (०) हे एका बाजूने हाजेरी लावून परतत असताना ग्लेन फिलिप किल्ला लढविण्याचा प्रयत्न केला. फिलिपने ४८ धावांची महत्वपूर्ण खेळी करताना शेवटपर्यंत नाबाद राहिला. भारताकडून रविचंद्रन अश्विनने ९७ धावांमध्ये २, सुंदरने ५६ धावांमध्ये ४ तर जडेजाने ७२ धावांमध्ये ३ गडी बाद केले. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाज बुमराहने केवळ ६ षटके गोलंदाजी केली. दुसरा वेगवान गोलंदाज आकाश दीपकडे कर्णधार रोहित शर्माने चेंडूच सोपविला नाही.
यशस्वीची अर्धशतकी खेळी
दुसऱ्या डावात ३५८ धावांचे मोठे आव्हान घेऊन युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल व कर्णधार रोहित शर्मा या दोघांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असताना रोहित शर्मा केवळ ८ धावांची खेळी करून परतला. यशस्वी जैस्वाल व शुभमन गिल यांनी ६२ धावांची भागीदारी करताना विजयाच्या आशा जागविल्या. मात्र भारताच्या ९६ धावा फलकावर लागल्या असताना शुभमनला सँटनरने चकविले. यानंतर विराट कोहली मैदानावर उतराला. यशस्वी जैस्वालने ४१ चेंडूत अर्धशतक झळकावले. यशस्वी आणि कोहलीने ३१ धावांची भागीदारी केली. आक्रमक खेळी करणाऱ्या यशस्वीला पुन्हा एकदा सँटनरने टिपले. यशस्वीने ७७ धावांच्या खेळीमध्ये ९ चौकार व ३ षटकार मारले.
कोहली, पंत, सर्फराज
विराट कोहलीने पुन्हा एकदा निराशा केली. १७ धावांची खेळी करून तो तंबूत परतला. त्यानंतर ऋषभ पंत शून्यावर धावबाद झाला. त्यामुळे ३ बाद १२७ धावांवरून भारताची अवस्था ५ बाद १४७ अशी झाली. पहिल्या कसोटीमध्ये १५० धावांची धडाकेबाज खेळी करणारा सर्फराज खानला सँटनरने टिपून भारताचा डाव गुंडाळण्याकडे वाटचाल सुरु केली. रवींद्र जडेजाने ४२ धावांची खेळी करताना थोडावेळ किल्ला सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. रविचंद्रन अश्विनने १८ धावांची तर आकाशदिपने १ धावा केल्या. एजाज पटेलने जडेजाला बाद करताना विजयावर शिक्कामोर्तब केले.
सँटनरचे ६ बळी
पहिल्या डावात ७ बळी टिपणाऱ्या सँटनरने दुसऱ्या डावात देखील भारताचे ६ फलंदाज माघारी पाठवले. सँटनरने २९ षटके टाकताना १०४ धावांच्या मोबदल्यात ६ गडी बाद केले. सँटनरने यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली हे आघाडीचे तर सर्फराज व अश्विन हे मधल्या फळीतील फलंदाज बाद केले. एजाज पटेलने ४३ धावांच्या मोबदल्यात २ तर ग्लेन फिलिपने ६० धावांच्या मोबदल्यात १ गडी बाद केला.
A tough loss for #TeamIndia in Pune.
Scorecard ▶️ https://t.co/YVjSnKCtlI #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/PlU9iJpGih
— BCCI (@BCCI) October 26, 2024
प्रथमच किवींचा मालिका विजय
मायदेशात भारताने १२ वर्षांनंतर मालिका गमावली आहे. घराच्या मैदानावर सलग १७ कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारताचा विजयरथ किवींनी रोखला. इंग्लंडने भारताला २०१२-१३ मध्ये चार कसोटीच्या सामन्यात २-१ असे पराभूत केले होते. या हंगामानंतर भारताने सलग १८ मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. न्यूझीलंडने भारतात दमदार कामगिरी करण्यात यश मिळविले. तब्बल ३६ वर्षांनंतर न्यूझीलंडने पहिला कसोटी सामना जिंकला होता. यावेळी प्रथमच न्यूझीलंडने कसोटी मालिका देखील जिंकूला आहे. १९५५ साली पहिल्यांदा भारत आणि न्यूझीलंड संघ आमनेसामने आले होते. दोन्ही देशांच्या क्रिकेट इतिहासात न्यूझीलंडने प्रथमच मालिका विजय केला आहे.
विश्वकसोटीची अंतिम फेरी आव्हानात्मक
न्यूझीलंड कसोटी मालिकेपूर्वी भारत विश्व कसोटी स्पर्धेत अव्वल स्थानी होता. बंगळुरू व पुणे या ठिकाणी भारताचा पराभव झाल्याचा फटका भारताला बसला आहे. दुसऱ्या कसोटीनंतर भारताच्या टक्केवारीत मोठा फरक पडला असून, भारताची टक्केवारी आता केवळ ६२.८२ एवढी झाली आहे. भारतापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचे ६२.५० एवढी टक्केवारी आहे. दोघांच्या टक्केवारीत आता केवळ ०.३२ टक्क्यांचा फरक राहिला आहे. श्रीलंका संघ ५५.५६ टक्क्यासह तिसऱ्या स्थानी आहे. पुढील महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यामध्ये ५ कसोटी सामन्याची बॉर्डर – गावस्कर मालिका खेळाल्याची आहे. या मालिकेत खेळणार बहुतांश संघ ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. त्यामुळे भारताला कोणत्याही परिस्थितीमध्ये किमान ४ विजयाची आवश्यकता आहे. असे न झाल्यास भारतासाठी विश्वकसोटी स्पर्धेची अंतिम फेरीत पोहोचणे आव्हानात्मक होणार आहे.





