IND vs NZ : विश्वचषकापूर्वीचा ‘अंतिम सराव’! भारत-न्यूझीलंड टी-२० मालिकेचा बिगुल वाजला; कोण आहे वरचढ? जाणून घ्या

IND vs NZ Head to Head Record in T20 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील थरार संपल्यानंतर आता टी-२० क्रिकेटचे वारे वाहू लागले आहेत. २१ जानेवारीपासून पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात होत असून, पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टी-२० विश्वचषक २०२६ पूर्वीची ही शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका असल्याने दोन्ही संघांसाठी ही ‘अंतिम चाचणी’ असणार आहे.
हेड-टू-हेड: टीम इंडियाचे पारडे जड –
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आतापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास टीम इंडियाचे वर्चस्व दिसून येते. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत २५ टी-२० सामने झाले आहेत, ज्यामध्ये भारताने १४ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर न्यूझीलंडला १० सामन्यांत यश आले आहे. भारताच्या १४ विजयांपैकी दोन विजय ‘सुपर ओव्हर’मधील आहेत. दोन्ही संघांमधील एक सामना टाय झाला आहे.
भारतातील इतिहास काय सांगतो?
न्यूझीलंडने २०१२ मध्ये भारताचा दौरा केला होता, तेव्हा त्यांनी १-० अशी मालिका जिंकून भारतीयांना धक्का दिला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या तिन्ही टी-२० मालिकांमध्ये टीम इंडियाने किवींना पराभूत करत आपले वर्चस्व राखले आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० मालिकेसाठी संघ –
भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर (पहिले ३ सामने), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकणधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, इशान किशन (यष्टिरक्षक), रवी बिश्नोई.
न्यूझीलंड संघ: मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, जेकब डफी, जॅक फाउल्क्स, मॅट हेन्री, काईल जेमीसन, बेवन जेकब्स, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टिम रॉबिन्सन, ईश सोधी.





