Virat Kohli Century : इंदूरमध्ये किंग कोहलीचा ‘विराट’ अवतार! ५४ व्या वनडे शतकासह लावली विक्रमांची रांग, पाहा यादी

Virat Kohli 54th ODI Century : भारतीय क्रिकेटचा ‘रन मशीन’ विराट कोहलीने इंदूरच्या होळकर स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात धावांचा पाऊस पाडत ऐतिहासिक शतक झळकावले. न्यूझीलंडने दिलेल्या ३३८ धावांच्या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना विराटने एकाकी झुंज दिली. या शतकी खेळीदरम्यान विराटने अनेक जागतिक विक्रमांना गवसणी घातली आहे.
विराट कोहलीचा ‘वन मॅन शो’ –
रोहित शर्मा, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर स्वस्तात बाद झाल्यानंतर भारताचा डाव अडचणीत आला होता. मात्र, विराटने एक बाजू लावून धरत ९१ चेंडूत आपले शतक पूर्ण केले, त्याला तरुण खेळाडू नितीश रेड्डी (५३) आणि हर्षित राणा यांनी मोलाची साथ दिली. विराटने या डावात अनेक प्रेक्षणीय कव्हर ड्राईव्ह आणि मनमोहक षटकार खेचून इंदूरच्या चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. यासह त्याने अनेक विक्रम रचले.
BELIEVE! 🇮🇳#TeamIndia #INDvNZ #3rdODI @IDFCfirstbank pic.twitter.com/iDhHO2Bg7z
— BCCI (@BCCI) January 18, 2026
विराट कोहलीचे नवे विक्रम:
१. ५४ वे एकदिवसीय शतक (Record 54th ODI Ton): विराटने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील ५४ वे शतक पूर्ण केले. त्याने स्वतःचाच सर्वाधिक वनडे शतकांचा विक्रम आणखी मजबूत केला आहे. सचिन तेंडुलकरच्या (४९) विक्रमाला त्याने यापूर्वीच मागे टाकले होते.
२. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८५ शतके: सर्व फॉरमॅट (कसोटी, वनडे, टी-२०) मिळून विराटच्या नावावर आता ८५ आंतरराष्ट्रीय शतके झाली आहेत. तो आता सचिन तेंडुलकरच्या (१०० शतके) जागतिक विक्रमाच्या आणखी जवळ पोहोचला आहे.
३. पाठलाग करताना २९ वे शतक (Master of Run Chases): एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना विराटने ठोकलेले हे २९ वे शतक आहे. जगात कोणत्याही फलंदाजाला पाठलाग करताना इतकी शतके झळकावता आलेली नाहीत.
४. कुमार संघकाराला टाकले मागे: या मालिकेदरम्यान विराटने श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज कुमार संघकारा याला मागे टाकून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. आता त्याच्या पुढे फक्त सचिन तेंडुलकर (३४,३५७ धावा) आहे.
हेही वाचा – Virat Push Darryl : …अन् विराटने डॅरिल मिचेलला दिला चक्क धक्का! भर मैदानात घडला हा प्रकार; पाहा VIDEO
५. न्यूझीलंडविरुद्ध ७ वे शतक: कीवी संघाविरुद्ध विराटने आपले सातवे एकदिवसीय शतक झळकावले. न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक वनडे शतके ठोकणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तो आता अव्वल स्थानावर आहे.





