IND vs NZ 2nd Test (Day 2) : न्यूझीलंडची पुणे कसोटीवर मजबूत पकड, टीम इंडियावर मात्र पराभवाची टांगती तलवार…

IND vs NZ 2nd Test (Day 2, Stumps) : भारत आणि न्यूझीलंडचे संघ पुण्यातील एमसीए स्टेडियमवर दुसऱ्या कसोटी सामन्यात आमनेसामने आहेत. सध्या या सामन्यात न्यूझीलंडचे पूर्णपणे वर्चस्व दिसत आहे. भारतीय संघाला पहिल्या डावात अवघ्या 156 धावांत गुंडाळल्यानंतर 103 ची आघाडी घेतली. त्यानंतर आता न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात वेगाने धावा करत आहे.
दुसऱ्या सत्राप्रमाणेच तिसऱ्या सत्रातही टॉम लॅथम अँड कंपनीने भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवत 3 गडी गमावून 113 धावा केल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने 5 बाद 198 धावा अशी मजल मारली आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात न्यूझीलंडची एकूण आघाडी आता 301 धावांवर पोहोचली आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ थांबला तेव्हा टॉम ब्लंडेल 30 आणि ग्लेन फिलिप्स 9 धावांवर खेळत होते. दुसऱ्या कसोटीत टीम इंडियावर मालिका पराभवाची टांगती तलवार आहे. मात्र हा पराभव टाळायचा असेल तर रोहितसेनेला तिसऱ्या दिवशी जोरदार कमबॅक करण्याशिवाय पर्याय नाही.
Stumps on Day 2
New Zealand extend their lead to 301 runs
Scorecard ▶️ https://t.co/3vf9Bwzgcd#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/uFXuaDb11y
— BCCI (@BCCI) October 25, 2024
पाहुण्या संघाने 301 धावांची आघाडी घेतली आहे. तसेच चेंडू ज्या पद्धतीने फिरत आहे, त्यामुळे चौथ्या डावात 300 च्या वरच्या कोणत्याही लक्ष्याचा पाठलाग करणे टीम इंडियासाठी सोपे जाणार नाही. न्यूझीलंडकडे अजूनही बरीच फलंदाजी बाकी आहे, त्यामुळे आता टीम इंडियाला सामना गमावण्याचा धोका आहे.
न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात 103 धावांची आघाडी घेऊन फलंदाजीला आला आणि संघ दुसऱ्या दिवसअखेर 200 धावांच्या जवळ पोहोचला आहे. न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात कर्णधार टॉम लॅथमने सर्वाधिक 86 धावा केल्या. त्याचवेळी डेव्हॉन कॉनवे 17 धावा केल्यानंतर, विल यंग 23 धावा केल्यानंतर, रचिन रवींद्र नऊ धावा केल्यानंतर तर डॅरिल मिशेल 18 धावा करून बाद झाला. पहिल्या कसोटीत शतक झळकावणारा रचिन रवींद्र दुसऱ्या डावात फ्लॉप ठरला.
वॉशिंग्टन सुंदरने पहिल्या डावात 7 विकेट घेतल्या होत्या आणि आता दुसऱ्या डावातही त्याने कहर केला आहे. दुस-या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने दुस-या डावात 5 गडी गमावले होते, त्यापैकी चार सुंदरच्या नावावर होते. या सामन्यात त्याने आतापर्यंत 11 विकेट घेतल्या आहेत. तर आर. अश्विननं दुसऱ्या डावात एका फलंदाजाला माघारी धाडलं आहे.
भारतीय फलंदाज पुन्हा अपयशी…
तत्पूर्वी, भारताने आज 1 बाद 16 धावांवरून पुढे खेळ सुरू केला आणि 140 धावांसाठी उर्वरित नऊ विकेट गमावल्या. शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल सहज धावा करत होते, पण शुभमन गिल आऊट होताच भारताची विकेट पडण्याची प्रक्रिया (पडझड) सुरू झाली आणि टीम इंडियाचा पहिला डाव156 धावांवर संपुष्टात आला. शुक्रवारी भारताला पहिला झटका शुभमन गिलच्या रूपाने बसला. तो 30 धावा करून बाद झाला. त्याचवेळी विराट कोहलीही काही विशेष करू शकला नाही आणि एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. सलामीवीर यशस्वी जैस्वाल 30, ऋषभ पंत 18 , सर्फराज खान 11 , आर अश्विन चार धावांवर, आकाश दीप सहा धावांवर आणि बुमराह खाते न उघडता बाद झाला. रवींद्र जडेजाने सर्वाधिक 38 धावा केल्या आणि वॉशिंग्टन सुंदर 18 धावा केल्यानंतर नाबाद राहिला.
मिचेल सँटनरचीही ‘सुंदर’ गोलंदाजी…
मिचेल सँटनरने भारतीय डाव स्वस्तात गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सँटनरने 19.3 षटकात 53 धावा देताना सात विकेट घेत एक खास कामगिरी आपल्या नावावर केली. भारतात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेणारा सँटनर हा न्यूझीलंडचा पाचवा गोलंदाज ठरला आहे. एवढेच नाही तर भारतातील कसोटीत सर्वोत्तम गोलंदाजी करणारा सँटनर हा न्यूझीलंडचा दुसरा फिरकी गोलंदाज देखील ठरला आहे. सँटनरव्यतिरिक्त ग्लेन फिलिप्स याने दोघांना बाद केलं. तर टीम साऊथीने 1 विकेट घेतली.
Team India : मोहम्मद शमी मैदानात कधी परतणार? पुनरागमनाबाबत मोठी अपडेट आली समोर…
तब्बल 12 वर्षांनी येणार नको ती वेळ….?
भारतानं यापूर्वी 2012 साली इंग्लंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका गमावली होती. त्यानंतर तब्बल 12 वर्ष भारतीय टीम घरच्या मैदानावर एकही मालिका हरलेली नाही. ही परंपरा कायम राखण्यासाठी पुणे टेस्टमध्ये काहीतरी अभूतपूर्व करण्याचं आव्हान रोहित शर्मा आणि कंपनीवर असणार आहे.





