Team India : मोहम्मद शमी मैदानात कधी परतणार? पुनरागमनाबाबत मोठी अपडेट आली समोर…

Mohammed Shami : भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. गेल्या वर्षी झालेल्या 2023 च्या वनडे क्रिकेट विश्वचषकानंतर शमीने एकही सामना खेळलेला नाही. पण आता एका मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, शमी सध्याच्या रणजी ट्रॉफी हंगामात बंगाल संघासाठी किमान दोन सामने खेळू शकतो. तसेच या दोन सामन्यांद्वारे शमी आगामी बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी आपली तयारी सुधारू शकतो.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, बंगालचे मुख्य प्रशिक्षक लक्ष्मीरतन शुक्ला यांनी शमीच्या रणजी करंडक स्पर्धेतील सहभागाला दुजोरा दिला आहे. शुक्ला म्हणाले की, “केरळविरुद्धच्या सामन्यासाठी शमी उपलब्ध होणार नाही. कर्नाटक आणि मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यात तो खेळेल अशी आम्हाला आशा आहे.” बंगाल आणि कर्नाटक यांच्यातील सामना 6 नोव्हेंबरपासून बेंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे. 13 नोव्हेंबरपासून बंगाल विरुद्ध मध्य प्रदेश सामना सुरू होणार आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबतही अपडेट आले समोर…
बंगाल संघाचे प्रशिक्षक लक्ष्मी रतन शुक्ला पुढे म्हणाले, “शमी हा भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे आणि ऑस्ट्रेलिया मालिकेत त्याचे योगदान महत्त्वाचे असेल. शमीने स्वतः सांगितले होते की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी मला बंगालसाठी रणजी ट्रॉफीमध्ये दोन सामने खेळायचे आहेत. रणजी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केल्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी त्यांचे मनोबल वाढेल आणि ही आमच्यासाठी चांगली गोष्ट असेल.”
शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या शर्यतीत..
शमीने नुकतेच एका कार्यक्रमात स्वत: सांगितले होते की, “तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी शर्यतीतून बाहेर पडलेला नाही. आता पूर्वीपेक्षा त्याला बरे वाटत आहे. शमीनेही नुकतीच पूर्ण रनअपसह गोलंदाजी सुरू केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी देशांतर्गत क्रिकेट खेळून स्वत:चे मूल्यमापन करायला आवडेल, असे शमीने स्पष्ट केले होते.”
फेब्रुवारीमध्ये झाली होती शस्त्रक्रिया…
साल 2023 च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकादरम्यान मोहम्मद शमीच्या घोट्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो फेब्रुवारी 2024 मध्ये लंडनला गेला आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याची पुनर्प्राप्ती प्रक्रिया सुरू होती, परंतु त्याच्या गुडघ्याला सूज आल्याने त्याच्या पुनरागमनास विलंब झाला. दुसरीकडे कर्णधार रोहित शर्मानेही सांगितले आहे की, मला ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर फॉर्ममध्ये असलेला शमी हवा आहे. अशा स्थितीत त्याला दोन रणजी सामने खेळण्याचा खूप फायदा होईल.





