IND vs NZ 1st Test : बेंगळुरू कसोटीत न्यूझीलंडचा विजय, भारताचा 8 विकेट्सनी पराभव करत रचला इतिहास…

IND vs NZ 1st Test Match Result : न्यूझीलंडने पावसामुळे प्रभावित झालेल्या बंगळुरू कसोटीत भारताचा 8 गडी राखून पराभव करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडचा हा भारतातील तिसरा कसोटी विजय आहे. किवी संघासमोर विजयासाठी फक्त 107 धावांचे लक्ष्य होते, जे किवी संघाने 2 गडी गमावून पूर्ण सहज पूर्ण केलं. रचिन रवींद्र हा सामन्याचा मानकरी ठरला. मालिकेतील पुढील सामना 24 ऑक्टोबरपासून पुण्यात होणार आहे.
न्यूझीलंड 8 विकेट्सने विजयी…
भारताने पहिल्या डावात सर्वबाद 46 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव 402 धावांवर संपला. अशाप्रकारे किवी संघाकडे 356 धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात भारतीय संघाने 462 धावा केल्या आणि 106 धावांची आघाडी घेतली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 27.4 षटकांत 2 गडी गमावून 107 धावांचे लक्ष्य सहज गाठले. न्यूझीलंडला जे दोन धक्के बसले ते म्हणजे कर्णधार टॉम लॅथमची (0) पहिली विकेट आणि डेव्हॉन कॉनवेची (17) दुसरी विकेट. रचिन रवींद्र 39 धावांवर तर विल यंग 45 धावांवर नाबाद राहिला. दोघांनी 72 धावांची नाबाद भागीदारी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताकडून दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहलाच दोन विकेट घेता आल्या बाकी गोलंदाज अपयशी ठरले.
New Zealand win the First Test by 8 wickets in Bengaluru.#TeamIndia will look to bounce back in the Second Test.
Scorecard ▶️ https://t.co/8qhNBrs1td#INDvNZ | @idfcfirstbank pic.twitter.com/6Xg4gYo8It
— BCCI (@BCCI) October 20, 2024
36 वर्षांनंतर किवी संघ भारतात विजयी…
भारताविरूध्द न्यूझीलंडने तिसरी कसोटी जिंकली आहे. तब्बल 36 वर्षांनंतर किवी संघाने भारतात कसोटी जिंकली आहे. यापूर्वी 1969 मध्ये ग्रॅहम डॉलिंगच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने नागपुरात भारताचा 167 धावांनी पराभव केला होता. त्याच वेळी, 1988 मध्ये जॉन राईटच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने वानखेडेवर भारताचा 136 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर आता आॅक्टोबर 2024 मध्ये किवी संघाने प्रथमच पाठलाग करताना विजय मिळवला आहे. यासह भारताची कसोटीतील सलग विजयी होण्याची मालिकाही संपुष्टात आली. या सामन्यापूर्वी भारताने घरच्या मैदानावर सलग सहा कसोटी जिंकल्या होत्या.
भारताचा पहिला डाव…
पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे पूर्णपणे वाहून गेला. त्यादिवशी नाणेफेकही होऊ शकली नाही. दुसऱ्या दिवशी नाणेफेक झाली आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितचा हा निर्णय चुकीचा ठरला आणि भारताचा पहिला डाव 46 धावांवर आटोपला. भारतीय फलंदाजीची क्रमवारी पत्त्याच्या घरासारखी कोसळली आणि संघाचे 11 खेळाडू 50 धावाही करू शकले नाहीत. रिषभ पंतनं 49 चेंडूत केलेल्या 20 धावा ही भारतीय संघाकडून कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्याच्याशिवाय सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने 63 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 13 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त एकलाही दुहेरी धावसंख्येचा आकडा गाठता आला नाही. कर्णधार रोहित शर्मा 2 धावा करून बाद झाला.
विराट कोहली, सर्फराज खान, केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांना तर खातेही उघडता आले नाही. याशिवाय कुलदीप 2,बुमराह 1 धाव काढून बाद झाला तर मोहम्मद सिराज 4 धावा काढून नाबाद राहिला. भारताच्या पहिल्या डावात फक्त 4 चौकार पाहायला मिळाले. यात पंतने 2 आणि यशस्वी जैस्वाल आणि मोहम्मद सिराज याने प्रत्येकी एक-एक चौकार मारला. न्यूझीलंडकडून मॅट हॅन्री याने भेदक गोलंदाजी केली. त्यानं 13.2 षटकात 15 धावा खर्च करत 5 विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय विल्यम ओ’रुर्क याने त्याला सुरेख साथ देत 12 षटकात 22 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. साउदीला रोहित शर्माच्या रुपात एक विकेट मिळाली.
न्यूझीलंडचा पहिला डाव….
बेंगळुरू कसोटीत न्यूझीलंडने पहिल्या डावात 402 धावांची मोठी मजल मारली. भारताचा पहिला डाव अवघ्या 46 धावांवर आटोपला, त्यामुळे पहिल्या डावात न्यूझीलंडची एकूण आघाडी 356 धावांची झाली. किवी संघाचा सर्वात मोठा हिरो ठरला तो रचिन रवींद्र, ज्याने 134 धावा करून आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. एकवेळ न्यूझीलंडची स्थिती 7 गड्यांच्या मोबदल्यात 233 धावा अशी झाली होती, यानंतर रचिनने टीम साऊदीसोबत आठव्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या 350 पार नेली. शतकवीर रचिनशिवाय टीम सौदी (65) आणि डेव्हॉन कॉनवे (91) यांनीही अर्धशतके झळकावून संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. टीम इंडियाकडून रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 3 तर मोहम्मद सिराजने 2 गडी बाद केले. आर. अश्विन आणि जसप्रित बुमराह यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
भारताचा दुसरा डाव…
दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. यादरम्यान, भारतासाठी पदार्पण करणारा सर्फराज खानने झळकावलेले दमदार दीडशतक, त्याला ऋषभ पंतने दिलेल्या साथीच्या जोरावर, भारताने दुसऱ्या डावात 462 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे न्यूझीलंड संघाला विजयासाठी 107 धावांचे आव्हान मिळाले. सर्फराज खानने टीम इंडियासाठी दुसऱ्या डावात 150 धावा केल्या. 195 चेंडूंचा सामना करताना त्याने 18 चौकार आणि 3 षटकार मारले. ऋषभ पंतने 105 चेंडूत 9 चौकार अन् 5 षटकाराच्या मदतीने 99 धावांची शानदार खेळी केली. विराट कोहलीने 70 , रोहित शर्माने 52 तर यशस्वी जैस्वालने 35 धावांचे योगदान दिले. सर्फराज व विराट कोहली यांच्यात 163 चेंडूत 136 धावांची तर ऋषभ पंत आणि सर्फराज याच्यांत 211 चेंडूत 177 धावांची महत्वपूर्ण भागीदारी झाली. यादरम्यान न्यूझीलंडकडून गोलंदाजीत मॅट हेन्री व विल्यम ओ’रुर्के यांनी प्रत्येकी 3, एजाज पटेलने 2 तर ग्लेन फिलिप व टीम साऊदी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.





