India vs New Zealand 1st Test (Day 3 Highlights) : रचिन रवींद्र व टीम साउदी यांच्या आठव्या गड्यासाठी केलेल्या दमदार भागीदारीच्या जोरावर, न्यूझीलंडने पहिल्या डावात 402 धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डावातील लाजिरवाण्या खेळानंतर भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी केली. भारताने दुसऱ्या डावात 3 बाद 231 धावा करताना चोख प्रत्युत्तर दिले. अनेक दिवसांपासून अडखळत असलेला विराट कोहली, पदार्पण करणारा सर्फराज खान व कर्णधार रोहित शर्मा यांनी दमदार अर्धशतके झळकाविताना भारताला सुस्थितीत आणले. तिसरा दिवसअखेर अजूनही भारत 125 धावांनी पिछाडीवर आहे.
बंगळुरू येथील चिन्नास्वामी मैदानावर पहिल्या डावात फलंदाजानी निराशाजनक विक्रमाची नोंद केली होती. मात्र दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा लयीत येत असल्याचे संकेत दिले. भारताच्या डावाची सुरुवात यशस्वी जैस्वाल व कर्णधार रोहित शर्मा यांनी केली. दोन्ही फलंदाजांनी खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी मुबलक वेळ घेताना भारतासाठी 72 धावांची सलामी दिली. यशस्वीने 6 चौकारांच्या मदतीने 35 धावांची खेळी केली. त्यानंतर रोहित शर्माने 18 वे अर्धशतक 59 चेंडूत पूर्ण केले. रोहित शर्मा 52 धावांच्या खेळीत 8 चौकार, 1 षटकार लगावला.
Stumps on Day 3 in the 1st #INDvNZ Test!
End of a gripping day of Test Cricket 👏👏#TeamIndia move to 231/3 in the 2nd innings, trail by 125 runs.
Scorecard – https://t.co/FS97LlvDjY@IDFCFIRSTBank pic.twitter.com/LgriSv3GkY
— BCCI (@BCCI) October 18, 2024
विराट सर्फराजची शतकी भागीदारी
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर पदार्पण करणाऱ्या सर्फराज आणि विराट कोहली यांनी दमदार फलंदाजी करताना 137 धावांची भागीदारी केली. दोन्ही खेळाडूंनी आक्रमण आणि संयम अशी दुहेरी भूमिका घेतल्याने न्यूझीलंडचा वेगवान आणि फिरकी मारा देखील निष्प्रभ ठरताना दिसत होता. या दोन्ही खेळाडूंनी 15 चौकार व 4 षटकार मारले. दरम्यान विराट कोहलीने 70 चेंडूत तर सर्फराजने केवळ 42 चेंडूंतच अर्धशतक पूर्ण केले. सर्फराजने विराटपेक्षा आक्रमक फलंदाजी केली. सर्फराजने 89.74 च्या स्ट्राईकरेटने नाबाद 70 धावा चोपल्या. विराट कोहलीला फिलिपने दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर बाद केले. विराट कोहलीने 70 धावांची दमदार खेळी केली. भारताने तिसऱ्या दिवसअखेर 3 बाद 231 धावांपर्यंत मजल मारली.
उद्याचा दिवस रंगतदर होणार ?
भारताने पहिल्या डावात 46 तर दुसऱ्या डावात 3 बाद 231 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडने पहिल्या डावात 402 धावा केल्याने त्यांच्याकडे अजूनही 125 धावांची आघाडी शिल्लक आहे. उद्या लढतीचा चौथा दिवस असल्याने भारतासमोर पिछाडी भरून काढताना न्यूझीलंड मोठे लक्ष्य द्यावे लागणार आहे. त्यामुळे सर्फराजसह ऋषभ पंत, केएल राहुल, रवींद्र जडेजा व रविचंद्रन अश्विन यांना किल्ला लढवावा लागणार आहे. त्यामुळे उद्याच्या दिवसात भारतीय फलंदाज कशी कामगिरी करतात, याची उत्सुकता असणार आहे.
तिसऱ्या दिवशी रवींद्रने गाजवले वर्चस्व
तत्पूर्वी, त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने 3 बाद 180 धावांपर्यंत मजल मारली होती. रचिन रवींद्र (22) व डेरील मिचेल (14) यांनी तिसऱ्या दिवशी खेळायला सुरुवात केली. त्यानंतर पहिल्या सत्रात डॅरिल मिशेल (18), टॉम ब्लंडेल (05), ग्लेन फिलिप्स (14) आणि मॅट हेन्री (08) हे झटपट बाद झाल्याने न्यूझीलंडची अवस्था 7 बाद 233 अशी झाली. यानंतर अनुभवी टीम साऊदी व रचिन रवींद्र यांनी आठव्या गड्यासाठी तब्बल 137 धावांची भागीदारी करताना संघाला 350 धावांचा टप्पा पार करून दिला. रचिन रवींद्रने कारकिर्दीतील दुसरे शतक तर टीम साऊदीने सातवे अर्धशतक झळकावले. रचिन रवींद्रने 13 चौकार आणि चार षटकाराच्या मदतीने 134 धावांची दमदार खेळी केली. साऊदीने पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 65 धावांचे योगदान दिले. रचिनच्या विकेटसह न्यूझीलंडचा डाव 402 धावांवर संपुष्टात आला.
तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी पहिल्या सत्रात चांगली गोलंदाजी केली. मात्र टीम साऊदी व रचिन रवींद्र यांच्या भागीदारीने भारतीय गोलंदाजांना लगाम लावला. शेवटच्या तीन बळीसाठी भारताला 169 धावा मोजाव्या लागल्या. कुलदीपने तीन गडी टिपले असले तरी त्याला न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगलेच चोपले. रवींद्र जडेजाने 3, सिराजने 2 तर बुमराह व अश्विन यांना केवळ 1 बळी टिपता आला.
विराट कोहलीच्या 9 हजार धावा
रनमशीन विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधील 9 हजार धावांचा टप्पा पार करणारा भारताचा चौथा फलंदाज ठरला. भारताचा मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने 15921, ‘द वॉल’ राहुल द्रविडने 13265 तर सुनील गावस्कर 10122 धावा केल्या आहेत. गावस्कर यांच्यानंतर 35 वर्षांच्या विराट कोहली चौथ्या स्थानी आला आहे. त्याने 197 डावांमध्ये हा महत्वाचा टप्पा पूर्ण केला. बांगलादेश विरुद्धच्या कसोटीमध्ये कोहलीने 27000 आंतरराष्ट्रीय धावा सर्वात जलद पूर्ण केल्या होत्या.
पहिल्या डावात भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो…
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला आलेल्या टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या 46 धावांवर गारद झाला. घरच्या मैदानावर भारताची ही सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. भारतीय फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. 9 धावांच्या स्कोअरवर भारताला पहिला धक्का बसला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 2 धावा करून माघारी परतला. विराट कोहली एकही धाव न काढता बाद झाला. यानंतर सर्फराज खान शून्यावर मॅट हेन्रीचा बळी ठरला. अशाप्रकारे भारताचे टॉप-3 फलंदाज 10 धावसंख्येवरच तंबूत परतले होते.
त्यानंतर भारताच्या मधली फळीच्या फलंदाजांनीही निराशा केली. यशस्वी जैस्वाल 13 धावा काढून माघारी परतला. त्यानंतर केएल राहुल सह अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि आर. अश्विन हे देखील शून्यावर माघारी परतले. त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने काही काळ संघर्ष केला पण त्यालाही अपयश आले. रिषभ पंत 49 चेंडूत केलेल्या 20 धावा काढून बाद झाला. ही भारतीय संघाकडून कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्यानंतर कुलदीप 2,बुमराह 1 धाव काढून बाद झाला तर मोहम्मद सिराज 4 धावा काढून नाबाद राहिला. अशाप्रकारे भारताचा पहिला डाव अवघ्या 46 धावसंख्येवर आटोपला.
भारताच्या पहिल्या डावात फक्त 4 चौकार पाहायला मिळाले. यात पंतने 2 आणि यशस्वी जैस्वाल आणि मोहम्मद सिराज याने प्रत्येकी एक-एक चौकार मारला. न्यूझीलंडकडून मॅट हॅन्री याने भेदक गोलंदाजी केली. त्यानं 13.2 षटकात 15 धावा खर्च करत 5 विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय विल्यम ओ’रुर्क याने त्याला सुरेख साथ देत 12 षटकात 22 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. साउदीला रोहित शर्माच्या रुपात एक विकेट मिळाली.
संक्षिप्त धावफलक :
भारत : पहिला डाव : 31.2 षटकांत सर्व बाद 46; न्यूझीलंड : पहिला डाव : 91.3 षटकांत सर्व बाद 402 : रचिन रवींद्र 134 (13 चौकार, 4 षटकार), डेव्होन कॉन्वे 91 (11 चौकार, 3 षटकार), टीम साऊदी 65 (5 चौकर, 4 षटकार), विल यंग 33 (5 चौकार), रवींद्र जडेजा 20-01-72-03, कुलदीप यादव 18.3-1-99-03, मोहम्मद सिराज 18-2-84-2, जसप्रीत बुमराह 19-7-41-1, रविचंद्रन अश्विन 16-1-94-1.
भारत : दुसरा डाव : तिसरा दिवसअखेर : 49 षटकांत 3 बाद 231 : यशस्वी जैस्वाल 35 (6 चौकार), रोहित शर्मा 52 (8 चौकार, 1 षटकार), सर्फराज खान नाबाद 70 (7 चौकार, 3 षटकार), विराट कोहली 70 (8 चौकार, 1 षटकार), एजाज पटेल 12-2-70-2, ग्लेन फिलिप 8-1-36-1.