IND vs NZ 1st Test Day 3 : बेंगळुरू कसोटीत न्यूझीलंडने पहिल्या डावात 402 धावांची मोठी मजल मारली आहे. भारताचा पहिला डाव अवघ्या 46 धावांवर आटोपला, त्यामुळे पहिल्या डावात न्यूझीलंडची एकूण आघाडी 356 धावांची झाली. किवी संघाचा सर्वात मोठा हिरो ठरला तो रचिन रवींद्र, ज्याने 134 धावा करून आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. त्याच्याशिवाय टीम सौदी आणि डेव्हॉन कॉनवे यांनीही अर्धशतके झळकावून संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
बंगळुरू कसोटीचा पहिला दिवस पावसाने वाहून गेला, त्यामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही. दुसऱ्या दिवशी नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो भारतीय संघाला महागात पडला आणि संपूर्ण भारतीय संघ 46 धावांवर बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने 3 बाद 180 धावा केल्या होत्या.
All out for 402 with a first innings lead of 356. Rachin Ravindra’s second Test century (134) leading the batting innings, alongside Devon Conway (91) and Tim Southee (65). Follow play LIVE in NZ on @skysportnz or @SENZ_Radio LIVE scoring | https://t.co/yADjMlJjpO 🏏 #INDvNZ pic.twitter.com/Sh6QCE8OGm
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 18, 2024
तिसऱ्या दिवशी रवींद्रने गाजवले वर्चस्व
न्यूझीलंडने शुक्रवारी तीन बाद 180 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि 222 धावा जोडण्यासाठी उर्वरित सात विकेट गमावल्या. डॅरिल मिशेल (18), टॉम ब्लंडेल (5), ग्लेन फिलिप्स (14) आणि मॅट हेन्री (8) हे झटपट बाद झाल्याने न्यूझीलंडची धावसंख्या 7 गड्यांच्या मोबदल्यात 233 धावा अशी झाली होती, यानंतर रचिनने टीम साऊदीसोबत आठव्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या 350 पार नेली. यादरम्यान रचिनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले, तर सौदीने कसोटी कारकिर्दीतील सातवे अर्धशतक झळकावले.
अर्धशतक झळकावल्यानंतर सौदी सिराजचा बळी ठरला. 73 चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 65 धावा करून तो बाद झाला. त्यानंतर एजाज पटेलही चार धावा करत माघारी परतला. त्यानंतर रचिन रवींद्र 134 धावांवर बाद झाला. कुलदीप यादवने त्याला बदली यष्टीरक्षक ध्रुव जुरेलकरवी झेलबाद केले. रचिनने 157 चेंडूंच्या खेळीत 13 चौकार आणि चार षटकार मारले. रचिनच्या विकेटसह न्यूझीलंडचा डाव 402 धावांवर संपुष्टात आला.
तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल, मॅट हेन्री आणि ग्लेन फिलिप्सच्या विकेट्स झटपट काढल्या. पण त्यानंतर शेवटच्या तीन विकेट्ससाठी 169 धावा खर्च झाल्या. कुलदीप यादवने निश्चितपणे तीन विकेट घेतल्या, त्याने 5 पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. रवींद्र जडेजानेही 3 तर मोहम्मद सिराजने 2 बळी घेण्यात यश मिळवले. त्याच्याशिवाय जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली.
पहिल्या डावात भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो…
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला आलेल्या टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या 46 धावांवर गारद झाला. घरच्या मैदानावर भारताची ही सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. भारतीय फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. 9 धावांच्या स्कोअरवर भारताला पहिला धक्का बसला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 2 धावा करून माघारी परतला. विराट कोहली एकही धाव न काढता बाद झाला. यानंतर सर्फराज खान शून्यावर मॅट हेन्रीचा बळी ठरला. अशाप्रकारे भारताचे टॉप-3 फलंदाज 10 धावसंख्येवरच तंबूत परतले होते.
त्यानंतर भारताच्या मधली फळीच्या फलंदाजांनीही निराशा केली. यशस्वी जैस्वाल 13 धावा काढून माघारी परतला. त्यानंतर केएल राहुल सह अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि आर. अश्विन हे देखील शून्यावर माघारी परतले. त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने काही काळ संघर्ष केला पण त्यालाही अपयश आले. रिषभ पंत 49 चेंडूत केलेल्या 20 धावा काढून बाद झाला. ही भारतीय संघाकडून कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्यानंतर कुलदीप 2,बुमराह 1 धाव काढून बाद झाला तर मोहम्मद सिराज 4 धावा काढून नाबाद राहिला. अशाप्रकारे भारताचा पहिला डाव अवघ्या 46 धावसंख्येवर आटोपला.
भारताच्या पहिल्या डावात फक्त 4 चौकार पाहायला मिळाले. यात पंतने 2 आणि यशस्वी जैस्वाल आणि मोहम्मद सिराज याने प्रत्येकी एक-एक चौकार मारला. न्यूझीलंडकडून मॅट हॅन्री याने भेदक गोलंदाजी केली. त्यानं 13.2 षटकात 15 धावा खर्च करत 5 विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय विल्यम ओ’रुर्क याने त्याला सुरेख साथ देत 12 षटकात 22 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. साउदीला रोहित शर्माच्या रुपात एक विकेट मिळाली.