IND vs ENG 2nd Test Day 1, Yashasvi Jaiswal Stats & Records : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरी कसोटी विशाखापट्टणम येथे खेळली जात आहे. पहिल्या दिवशी भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 6 विकेटवर 336 धावसंख्येपर्यत मजल मारली आहे.
विशाखापट्टणम कसोटीचा पहिला दिवस भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या नावावर होता. खरे तर एकीकडे भारतीय फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतत होते , पण दुसऱ्या बाजूला यशस्वी जैस्वालने इंग्लिश गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यशस्वी जैस्वाल 257 चेंडूत 179 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. आतापर्यंत या फलंदाजाने आपल्या डावात 17 चौकार आणि 5 षटकार मारले आहेत. त्याचबरोबर यशस्वी जैस्वालने पहिल्याच दिवशी काही विक्रम आपल्या नावावर केले.
यशस्वी हा 23 वर्षांचा होण्यापूर्वी भारत आणि परदेशात कसोटीत शतक झळकावणाराभारतातील केवळ चौथा फलंदाज आहे. यशस्वीने वेस्ट इंडिजमधील पहिल्या कसोटीत 171 धावांची शानदार खेळी केली. आता त्याने भारतात शानदार शतक झळकावले आहे. यशस्वीच्या आधी रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी ही कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे हे चार खेळाडू मुंबईच्या रणजी संघाचा भाग आहेत.
तसेच भारताकडून कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वीरेंद्र सेहवाग अव्वल स्थानावर आहे. 2004 मध्ये मुलतान कसोटीच्या पहिल्या दिवशी वीरेंद्र सेहवागने 228 धावा केल्या होत्या. त्याचवेळी आज यशस्वी जैस्वालने 179 धावा केल्या. भारताकडून कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत यशस्वी जैस्वाल सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. तो 195 आणि 180 धावांसह दुसऱ्या आणि पाचव्या स्थानावर आहे. वसीम जाफर 192 धावांसह तिसऱ्या तर शिखर धवन 190 धावांसह चौथ्या स्थानावर आहे.