IND vs ENG 4th Test Live Streaming : राजकोट कसोटीनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची कसोटी मालिका रोमांचक वळणावर आली आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला आणि पुढचे दोन सामने टीम इंडियाने जिंकले. या मालिकेत भारतीय संघ आता 2-1 ने आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत मालिकेतील चौथा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.
इंग्लंडला मालिका जिंकायची असेल, तर त्यांना मालिकेतील उर्वरित दोन्ही सामने कोणत्याही किंमतीला जिंकावे लागतील. त्याचवेळी, भारतीय संघही आपली विजयी घोडदौड अबाधित ठेवण्यासाठी आणि पुढील सामन्यात विजय मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसणार आहे.
भारत आणि इंग्लंडचे संघ आता रांचीमध्ये आमनेसामने येणार आहेत. येथील जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये हा सामना होणार आहे. 2017 मध्ये येथे प्रथमच कसोटी सामना खेळला गेला. आतापर्यंत येथे फक्त दोन कसोटी सामने खेळले गेले आहेत. येथे टीम इंडियाने एक सामना जिंकला असून एक सामना अनिर्णित राहिला आहे. या दोन सामन्यांमध्ये या मैदानाच्या खेळपट्टीवर वेगवान आणि फिरकी गोलंदाजांना समान मदत मिळत असल्याचे दिसून आले आहे.
कधी आणि कुठे पहायचे लाइव्ह?
या दोघांमधला पुढचा सामना 23 फेब्रुवारीपासून होणार आहे. या सामन्यातील पहिला चेंडू शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता टाकला जाईल. जिओ सिनेमा (Jio Cinema) ॲपवरही या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग मोफत उपलब्ध असेल. स्पोर्ट्स-18 नेटवर्कच्या चॅनेलवर थेट प्रक्षेपण पाहता येईल. हा सामना डीडी स्पोर्ट्सवर मोफत डीटीएच कनेक्शनवरही पाहता येईल.
मालिकेत आतापर्यंत काय-काय घडलंय?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळला गेला. या सामन्यात ओली पोपच्या शानदार शतकाच्या जोरावर इंग्लंडने भारताचा 28 धावांनी पराभव केला. यानंतर विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 106 धावांनी पराभव करत पुनरागमन केले. राजकोट येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाने 434 धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.