IND vs ENG 3rd Test : कर्णधार रोहितच्या ‘त्या’ निर्णयामुळे यशस्वीची 27 वर्ष जुना विश्वविक्रम मोडण्याची हुकली संधी…

Rohit Sharma & Yashasvi Jaiswal Record : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये झाला. तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा 434 धावांनी पराभव केला आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला. भारताने दुसऱ्या डावात चार विकेट गमावत 430 धावा केल्या आणि डाव घोषित केला. इंग्लंडला 557 धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात इंग्लिश डाव 122 धावांवर आटोपला.
सामन्याच्या चौथ्या दिवशी (18 फेब्रुवारी) यशस्वी जैस्वालने अप्रतिम कामगिरी करत द्विशतक झळकावले. यशस्वीने 236 चेंडूत 214 धावांची नाबाद खेळी खेळली. यशस्वीने आपल्या खेळीत 14 चौकार आणि 12 षटकार मारले. यासह कसोटी सामन्याच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत यशस्वी आता संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
यशस्वीने ऑक्टोबर 1996 मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या 257 धावांच्या खेळीत 12 षटकार मारणाऱ्या पाकिस्तानच्या वसीम अक्रमच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. यशस्वीला अक्रमचा 27 वर्ष जुना विक्रम मोडण्याची संधी होती, पण त्याआधीच भारतीय कर्णधार रोहित शर्माने दुसरा डाव घोषित केला.
कसोटीच्या एकाच डावात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज…
2024 – यशस्वी जयस्वाल वि. इंग्लंड 12
1996 – वसिम अक्रम वि, झिम्बाब्वे 12
2003 – मॅथ्यू हेडन वि. झिम्बाब्वे 11
2002 – नॅथन अस्टल वि. इंग्लंड 11
2014 – ब्रॅंडन मॅक्युलम वि. पाकिस्तान 11
2014 – ब्रँडन मॅक्युलम वि. श्रीलंका 11
2016 – बेन स्टोक्स वि. दक्षिण आफ्रिका 11
2023 – कुशल मेंडीस वि. आयर्लंड 11
तसेच यशस्वी जैस्वाल हा कसोटी सामन्याच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. यशस्वीने नवज्योत सिंग सिद्धू आणि मयंक अग्रवाल यांना मागे टाकले. सिद्धू आणि मयंक यांनी एका कसोटी डावात प्रत्येकी 8 षटकार ठोकले होते. एका कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा यशस्वी हा भारताचा फलंदाज बनला आहे. यशस्वीने रोहित शर्माचा विक्रम मोडला, ज्याने 2019 च्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत 19 षटकार ठोकले होते. पाच सामन्याच्या कसोटी मालिकेतील तीन सामन्यात यशस्वीच्या नावावर आता 22 षटकार झाले आहेत.





