Abhimanyu Easwaran : कसोटी पदार्पणाचे स्वप्न अधुरे राहिल्याने अभिमन्यु भावुक! गंभीरने दिला शब्द; म्हणाला, ‘मी तुला…’

पाचव्या कसोटीत संधी न मिळाल्याने अभिमन्यु भावुक –
पहिल्या चार कसोटी सामन्यांमध्ये त्याला संधी मिळाली नाही. ओव्हल येथील पाचव्या कसोटी सामन्यात काही खेळाडू जखमी झाल्याने अभिमन्युला संधी मिळेल, अशी आशा होती. पण तिथेही त्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही. या निराशेनंतर अभिमन्यु पूर्णपणे खचला. त्याने आपल्या वडिलांना फोन करून आपली निराशा व्यक्त केली. अभिमन्युचे वडील म्हणाले, “माझ्या मुलाने मला सांगितले की, ‘पप्पा, मला अजूनही संधी मिळाली नाही.’ तो खूप भावुक झाला होता.”
२३ वर्षे स्वप्नासाठी मेहनत केली –
एका यूट्यूब चॅनेलवर बोलताना त्यांनी सांगितले की, अभिमन्यु आता बंगळुरुला जाऊन दुलीप ट्रॉफीची तयारी करेल आणि नंतर काही काळ देहरादूनला परतेल. त्यांनी पुढे सांगितले, “अभिमन्युने २३ वर्षे आपल्या स्वप्नासाठी मेहनत केली आहे. एक-दोन सामन्यांमध्ये संधी न मिळाल्याने तो खचणार नाही, पण ओव्हल कसोटीमधील निराशेने तो खूप दुखावला गेला आहे.”
हेही वाचा – BCCI : बीसीसीआय नवीन प्रशिक्षकांच्या शोधात, सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये ‘या’ तीन प्रमुख पदांसाठी मागवले अर्ज
गौतम गंभीरने दिला शब्द –
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने अभिमन्युला धीर दिला आहे. अभिमन्युच्या वडिलांनी सांगितले की, गंभीर यांनी त्याला आश्वासन दिले आहे की, “तू योग्य मार्गावर आहेस. तुझी वेळ लवकरच येईल आणि तुला पुरेशा संधी मिळतील. मी तुला एक-दोन सामन्यांनंतर संघातून बाहेर काढणार नाही.”
हेही वाचा – Haider Ali : क्रिकेट विश्वात खळबळ! पाकिस्तानच्या क्रिकेटरला चालू सामन्यातून अटक, काय आहे प्रकरण?
आता संपूर्ण प्रशिक्षक स्टाफनेही अभिमन्युला पाठिंबा दर्शवला आहे. गेल्या चार वर्षांपासून कसोटी पदार्पणाच्या प्रतीक्षेत असलेला अभिमन्यु आपली मेहनत आणि धैर्य कायम ठेवून पुढे जात आहे. आता गंभीर यांच्या आश्वासनामुळे त्याच्या चाहत्यांमध्येही एक नवी आशा निर्माण झाली आहे.





