IND vs ENG : लढवय्या रवींद्र जडेजाचा मोठा पराक्रम; जागतिक क्रिकेटमध्ये ठरला केवळ चौथाच खेळाडू!

Ravindra Jadeja Special Record : लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून 22 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 2-1 अशी महत्त्वाची आघाडी घेतली आहे. या चुरशीच्या सामन्यात रवींद्र जडेजाने नाबाद अर्धशतक झळकावत जोरदार लढा दिला, पण त्याला भारतीय संघाला पराभवापासून वाचवता आले नाही. रवींद्र जडेजाने जोरदार लढा देताना झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर एक खास पराक्रम केला आहे. तो काय आहे? जाणून घेऊया.
पाचव्या दिवशी सामन्यात पाहिला मिळाला रोमांच –
पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी 193 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र, इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच भारतीय फलंदाजांवर दबाव टाकला. जोफ्रा आर्चर, कर्णधार बेन स्टोक्स आणि ब्रायडन कार्स यांच्या तिखट गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज एकामागून एक तंबूत परतले. परिस्थिती अशी झाली की, भारतीय संघाने 74.5 षटकांत 170 धावांवर गारद झाला. रवींद्र जडेजाने एका बाजूने खिंड लढवली आणि 61 धावांची नाबाद झुंजार खेळी केली, पण दुसऱ्या बाजूने त्याला फारशी साथ मिळाली नाही.
A determined and well fought innings
Took #TeamIndia close
Chin up, Ravindra Jadeja 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/X4xIDiSmBg#ENGvIND | @imjadeja pic.twitter.com/jGpfgHAeNM
— BCCI (@BCCI) July 14, 2025
जडेजा ठरला भारताचा दुसरा, तर जगातील चौथा खेळाडू –
रवींद्र जडेजाला संघाला विजय मिळवून देता आला नसला, तरी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा टप्पा गाठला आहे. त्याने 61 धावांच्या खेळीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7,000 धावांचा टप्पा गाठला. यासह, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7,000 धावा आणि 600 विकेट्स घेणारा जगातील चौथा आणि भारतातील दुसरा खेळाडू ठरला. यापूर्वी हा पराक्रम भारताचे कपिल देव, दक्षिण आफ्रिकेचा शॉन पोलॉक आणि बांगलादेशचा दिग्गज अष्टपैलू शाकिब अल हसन यांनीच केला होता. जडेजाच्या नावावर 361 सामन्यांत 7,018 धावा आणि 611 विकेट्स आहेत.
हेही वाचा – Yash Dayal Case : ‘पाच वर्षे कोणी मूर्ख बनू शकत नाही…’, यश दयालला लैंगिक शोषण प्रकरणात कोर्टाचा दिलासा
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7,000 धावा आणि 600 विकेट्स घेणारे खेळाडू:
- शाकिब अल हसन: 14,730 धावा, 712 विकेट्स
- कपिल देव: 9,031 धावा, 687 विकेट्स
- शॉन पोलॉक: 7,386 धावा, 829 विकेट्स
- रवींद्र जडेजा: 7,018 धावा, 611 विकेट्स
हेही वाचा – Olympics 2028 मधील क्रिकेटचे वेळापत्रक जाहीर! कधी आणि कुठे होणार सामने? जाणून घ्या
रवींद्र जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये 83 सामन्यांत 36.97 च्या सरासरीने 3,697 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांत त्याच्या नावावर 2,806 धावा, तर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 515 धावा आहेत. विकेट्सच्या बाबतीत, त्याने कसोटीत 326, एकदिवसीय सामन्यांत 231 आणि टी-20 मध्ये ५४ विकेट्स घेतले आहेत.





