IND vs ENG : सिराजने विकेट घेतल्यानंतर आक्रमक सेलिब्रेशन करत डकेटला दिला धक्का, VIDEO होतोय व्हायरल

IND vs ENG Siraj aggressive celebration front of Duckett : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे. पहिल्या डावात इंग्लंडने ३८७ धावा केल्या, तर भारतानेही प्रत्युत्तरात ३८७ धावा केल्या. १३ जुलैपासून चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आणि पहिल्या सत्रातच मोहम्मद सिराजने इंग्लंडला पहिला धक्का दिला. मात्र, सिराजने बेन डकेटला बाद करताना केलेल्या उत्सवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सिराजचे सेलिब्रेशन ठरले चर्चेचा विषय –
सिराजने ५.५ षटकांत बेन डकेटला बाद करून त्याला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. बेन डकेटला इंग्लंडसाठी चांगली सुरुवात करता आली नाही. सिराजच्या चेंडूवर डकेटने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण तो मिडऑनच्या दिशेने झेलबाद झाला. यानंतर सिराजने डकेटच्या डोळ्यात डोळे घालून त्याच्यावर गरजला. सिराज त्याच्याजवळ जाऊन जल्लोष साजरा करू लागला, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये दिसते की, डकेट बाद झाल्यावर पॅव्हेलियनकडे जात आहे, तेव्हा सिराज त्याच्यासमोर येतो आणि जोरजोरात ओरडतो.
THE AGGRESSION FROM DSP SIRAJ AFTER DISMISSING DUCKETT. 🥶pic.twitter.com/AehUlhE29t
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 13, 2025
यानंतर भारतीय खेळाडू सिराजसोबत जल्लोष साजरा करतात. यावेळी सिराज आपल्या भावनांना आवर घालू शकला नाही. उत्साहात साजरा करताना त्याचा खांदा डकेटला लागला आणि त्याच्या प्रतिक्रियेकडे पाहून पंचांनी त्याला जणू इशारा दिला. सिराजच्या या प्रतिक्रियेमुळे लॉर्ड्स टेस्टमध्ये आता दोन्ही संघांमध्ये एक वेगळाच थरार पाहायला मिळणार आहे, ज्याची सुरुवात तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या समाप्तीला झाली होती.
हेही वाचा – IND vs ENG : ‘आम्ही याला तमाशा म्हणतो…’, वेळकाढूपणावर रवी शास्त्रींनी इंग्लंडच्या खेळाडूंना फटकारलं
मोहम्मद सिराजची कामगिरी –
लॉर्ड्स येथे झालेल्या सामन्यात सिराजने पहिल्या डावात २ विकेट्स घेतल्या. त्याने २३.३ षटकांत ८५ धावा खर्च केल्या. दुसऱ्या डावात त्याने ६ षटकांत केवळ १० धावा देत २ फलंदाजांना बाद केले. भारतीय संघाला दुसऱ्या डावात सिराजकडून मोठ्या अपेक्षा आहेत. लॉर्ड्सच्या मैदानावर सिराजचा विक्रम उल्लेखनीय आहे. त्याने आतापर्यंत या मैदानावर १२ विकेट्स घेतल्आ आहेत. दुसरीकडे, जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात ५ विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या डावात बुमराहही शानदार कामगिरी करून इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल.





