Sarfaraz Emotional Post : “मी सर्वस्व पणाला लावून लढेन!”; श्रीलंका मालिकेतून डच्चू मिळताच सर्फराझ खानची इन्स्टावर भावुक पोस्ट व्हायरल
Sarfaraz Emotional Post : सर्फराझ खानने सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक आणि अर्थपूर्ण पोस्ट शेअर करत आपल्या मनातील खंत व जिद्द व्यक्त केली आहे.

Sarfaraz Khan Viral Insta Story Jersey Movie Duleep Trophy West Zone : भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असताना कसोटी संघात स्थान न मिळालेला मुंबईचा तडफदार फलंदाज सर्फराझ खान (Sarfaraz Khan) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रात आला आहे. संघातून सातत्याने दुर्लक्षित केले जात असताना सर्फराझने सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक आणि अर्थपूर्ण पोस्ट शेअर करत आपल्या मनातील खंत व जिद्द व्यक्त केली आहे. भारत आणि श्रीलंका क्रिकेट इलेव्हन यांच्यातील सराव सामना सुरू असतानाच सर्फराझची ही इन्स्टाग्राम स्टोरी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली.
‘जर्सी’ चित्रपटाचा फोटो अन् भावुक कॅप्शन!
सर्फराझ खानने प्रसिद्ध ‘जर्सी’ चित्रपटातील अभिनेता नानीचा फोटो शेअर करत लिहिले, “मी कदाचित फिट बसत नसेन, पण माझ्याकडचे सर्वस्व पणाला लावून लढेन.” यासोबतच त्याने “New Chapter, Jersey 2” असेही लिहिले. ‘जर्सी’ चित्रपटात वयाच्या ३६ व्या वर्षी पुन्हा क्रिकेटमध्ये कमबॅक करून राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या खेळाडूची कथा दाखवण्यात आली होती. त्यामुळे सर्फराझची ही पोस्ट भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठीची त्याची जिद्द आणि चिकाटी स्पष्टपणे दाखवून देते.
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली पुनरागमनाची तयारी!
Sarfaraz Khan, who is currently out of the Indian team, expressed his disappointment by sharing a heartfelt post on his Instagram Story. pic.twitter.com/qfL0DM5X22
— ViratKoisa Sports (@ViratKoisa18) August 7, 2026
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर सर्फराझ खानला भारतीय कसोटी संघात स्थान मिळालेले नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर रचूनही इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि आता श्रीलंका मालिकेसाठी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, हार न मानणारा सर्फराझ आता २३ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप करंडक (Duleep Trophy) स्पर्धेत ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील ‘पश्चिम विभाग’ (West Zone) संघाकडून खेळणार आहे.
२०२४ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू येथे शानदार शतक झळकावणाऱ्या सर्फराझने भारतासाठी ६ कसोटी सामन्यांत ३७१ धावा केल्या आहेत. दुलीप करंडकात पुन्हा एकदा खोऱ्याने धावा ओढून भारतीय संघाचे दरवाजे ठोठावण्यासाठी सर्फराझ पूर्णपणे सज्ज झाला आहे.





